‘ऋतुभारणीच्या गोंदणावर... नव्या वर्षाचा झुलता गुलमोहर... नव्या मोगरी गंधाचा पाझर... देह पुष्करणीत फुलवत गेला ...’
नव्या वर्षाच्या गार हवेचा झोंबता गारवा श्वासात भरून घेताना, कुठेतरी मागे वळून पाहताना माझी लेखणी थबकली. भूतकाळाच्या धुळवाटांवरून चालत आलेल्या आठवणींनी पुन्हा एकदा मनात ठसा उमटवला. २०२५ हे वर्ष संपत असताना, त्याच्या सुख-दु:खाच्या, आशा-निराशेच्या, विजय-पराजयाच्या गोंदणखुणा मनावर कोरल्या गेल्या आहेत. आता २०२६ च्या नव्या पहाटेचे स्वागत करताना, मागे वळून पाहणे अपरिहार्य ठरते. आठवली ती त्रिवेणी संगमाच्या गाभाऱ्यात उगवलेली ती पहाट, गंगेच्या लाटांवरून वाहणारा मंत्रोच्चारांचा निनाद आणि साधू-संतांच्या कंठातून उमटणारा ओंकार जणू काळाच्या मण्याना थांबवून ठेवणारा एक क्षण. महाकुंभाच्या स्नानात लाखो जीव आत्मशुद्धीचा अनुभव घेत होते. या अशा अक्षयवटाच्या सावलीत उभं राहिलं की जाणवतं की जन्म-मृत्यूच्या पलीकडेही एक अखंड प्रवाह आहे, जो आपल्याला निसर्गाच्या कुशीत पुन्हा पुन्हा सामावून घेतो. मग आठवलं रामलल्लाच्या पुनर्स्थापनेनंतर अयोध्येच्या गाभाऱ्यात जणू भक्तिभावाचा एक नवा सूर्य उगवला आणि त्या तेजात त्या तेजात भूतकाळाच्या धुळवाटा विरघळून गेल्या आणि भविष्याच्या कलामंडपी एक नवा दीप प्रज्ज्वलित झाला. “कुंभाच्या गर्दीत, साधूंच्या अखाड्यांत उमटलेले आंतरराष्ट्रीय भाविकांच्या ओठांवर मंत्र” आपल्या भरतभुची "विश्वगुरू" ओळख पुन्हा अधोरेखित करत होते. जणू प्रत्येक श्वासात अध्यात्माचा गंध होता. प्रत्येक पावलात मोक्षाची चाहूल आणि प्रत्येक डोळ्यात एक अदृश्य प्रकाश.
काळाच्या गाभाऱ्यातून उमटणाऱ्या अध्यात्मिक निनादानंतर भारताने विज्ञानाच्या आकाशातही नवे दीप प्रज्वलित केले. इस्रोच्या स्पेस डॉकिंग प्रयोगाने जणू दोन युगांचे संगम घडवले जसे त्रिवेणी संगमात नद्या एकत्र येतात, तसेच अंतराळात दोन यानांच्या मीलनाने भविष्याची चाहूल दिली. कुंभाच्या गर्दीत जशी श्रद्धेची लाट उसळते, तशीच क्रिकेटच्या मैदानावर देखील क्रिकेट प्रेमिंकरिता विजयाची लाट उसळली. आपल्या पुरुष आणि महिला संघांनी जागतिक विजेतेपद मिळवून भारताच्या ओठांवर आनंदाचे गीत चढवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्यांग महिला खेळाडूंनी Blind T20 World Cup जिंकून जगाला दाखवले की “मर्यादा ही केवळ देहाची असते, मनाच्या अथांगतेला कुठलीही सीमा नसते. नंतर मात्र सैन्याच्या शौर्यकथेत "ऑपरेशन सिंदूर" जणू रक्तवर्णी सूर्यकिरणासारखे झळकले. भारताच्या सुरक्षेची भिंत अधिक भक्कम झाली आणि जगभरात भारताचा प्रभाव अधिक स्पष्ट झाला. या सर्व घटनांनी २०२५ हे वर्ष फक्त आठवणींच्या गोंदणावर कोरले गेले नाही, तर अभिमानाच्या सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले.
या सर्व तेजोमय घटनांच्या दरम्यान, जणू एका शुभ्र रांगोळीवर काळा ठिपका उमटावा, तसा पेहलगावचा संहार २०२५ च्या आठवणीत कोरला गेला. काश्मीरच्या निसर्गरम्य दऱ्यांत, जिथे देवदारांच्या सावलीत शांतता नांदते, तिथेच दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी निरपराध जीवांचा श्वास थांबवला. २६ नागरिकांचा बळी, असंख्य जखमी आणि त्या रक्तरंजित क्षणांनी मानवतेच्या चेहऱ्यावर गालबोट उमटवले. जगाला दाखवून दिले की, अध्यात्मिक तेज आणि वैज्ञानिक प्रगतीच्या सोबतच दहशतवादाचा अंधार अजूनही आपल्या सभोवती घुटमळतो आहे. पण या अंधारातही एक सत्य स्पष्ट झाले भारताची जिद्द, भारताची एकता आणि मानवतेच्या रक्षणासाठीची त्याची अखंड लढाई जगाच्या छातीत धडकी भरवून गेली. संगीत-साहित्य-चित्रपट या क्षेत्रांना २०२५ ने दिलेला धक्का अजूनही मनाला चटका लावतो. याच काळात जणू अचानक भैरवीचा स्वर लागावा तसं काहीस झालं, जीवनाच्या संगीताचा स्वरच जणू थांबला “आसामचा हृदयस्पर्शी आवाज जुबीन गर्ग” स्कूबा डायव्हिंगच्या अपघातात काळाच्या पडद्याआड गेला. त्याच्या "या अली"सारख्या गाण्यांनी लाखो हृदयांना स्पर्श केला होता. त्यातच पंजाबी सुरांचा उत्साह हरपला, राजवीर जवांदा यांच्या जाण्याने तरुणाईच्या ओठांवरचा आनंदाचा झरा थांबला. त्यांच्या "कली जवांदे दी"सारख्या गाण्यांनी पंजाबी संगीताला नवा उत्साह दिला होता. त्यातच धर्मेंद्र, मनोज कुमार, असरानी, सतीश शाह यांसारख्या कलाकारांनी काळाच्या पडद्याआड जाऊन आपली रंगमंचावर घेतलेली एझिट ही आपल्याला आठवणींच्या गोंदणावर खोल खोल गोंदणेच कोरून गेली. धर्मेंद्र "He-Man of Bollywood", ज्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने तरुणींच्या हृदद्याची धडकन होते ज्यांना आंतरराष्ट्रीय मासिकांनी त्यांना "World’s Most Handsome Man" म्हटले, आणि भारतीय सिनेमाला एक वेगळा दर्जा तर दिलाच पण सर्वाच्या समोर आपल्या ड्रीम गर्ल हेमामालिनी यांचे ही हृद्य चोरले.त्यांच्या अभिनयात ताकद होती, पण त्याचबरोबर एक कोमल भावही होता जो "शोले"च्या वीरूपासून "चुपके चुपके"च्या विनोदी भूमिकेत दिसून आला, तोच वीरू आपल्या खास अंदाजात म्हणायचा, "बसंती भी राजी और मौसी भी राजी, इसी लिये मरना कॅन्सल..." असं जणू हसत-हसवत मृत्यूला सामोरे गेले. त्या आधी मनोज कुमार नव्हे नव्हे "भारत कुमार", ज्यांनी देशभक्तीला सिनेमाच्या पडद्यावर अमरत्व दिले. "उपकार", "पूरब और पश्चिम", "रोटी कपडा और मकान" या चित्रपटांतून त्यांनी भारताच्या भावनांना पडद्यावर मूर्त रूप दिलं. भारताच्या संस्कृतीला मोठ्या पडद्यावर राष्ट्रभक्तीचा गंध दिला आणि भारताच्या जनमानसाला देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली" असरानी आणि सतीश शाह या विनोद्विरांबद्दल तर काय सांगावे? ज्यांनी आपल्या अभिनयातून हसवले, रडवले आणि विचार करायला लावले."ये जो है जिंदगी"सारख्या मालिकेतून सतीश शाह यांनी घराघरात आनंदाचा झरा वाहवला. असरानींच्या "जेलर" भूमिकेने "शोले"ला एक वेगळा रंग दिला. घर सोडून जाता जाता लाडक्या लेकीने जणू जाता जाता तिच्या आवडीच्या गोष्टी न्याव्यात अगदी तशाच सरत्या वर्षाने संगीत आणि चित्रपट या क्षेत्रांना दिलेला हा मोठा झटका होता. काय बर वाटलं असेल या जात्या आत्म्यांना मग सहज शब्द सुचले... ‘वक्त की धूप में ... तपता हुआ सहेरा.... जिंदगी केहेलाता है ... और .... फिसलती पलों की रेत में .... मेरा आनाजाना .... होता है....’ कारण त्यांनी आपल्या कलाकृतींनी जीवनाला रंग दिला आणि त्यांच्या जाण्याने त्या रंगांची एक छटा हरपली. काळच तो, घट्ट मुठीतील वाळूसारखा हळूहळू मूठ रिकामी करणारच, आणि पाठी ठेऊन जाणार त्या फक्त आठवणीच्या गोंदण खुणा... “२०२५ च्या आठवणींनी मनाला गोंदण दिलं, आता २०२६ च्या नव्या पहाटेचे स्वागत करताना मनात एकच भावना आशेचा गुलमोहर, श्रद्धेचा दीप, आणि जीवनाच्या प्रत्येक श्वासात उमलणारा नवा गंध.






