Monday, January 26, 2026

भाजपच्या कार्यकर्त्याने भरला डुप्लिकेट एबी फॉर्म; आता फोन बंद करून झाला गायब

भाजपच्या कार्यकर्त्याने भरला डुप्लिकेट एबी फॉर्म; आता फोन बंद करून झाला गायब

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीदरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या एका इच्छुकाने अधिकृत एबी फॉर्मची डुप्लिकेट कॉपी तयार करून आपल्या पत्नीच्या नावे फॉर्म दाखल केला आणि आता फोन बंद करून नॉट रीचेबल झाला आहे. जागावाटपात हा प्रभाग शिवसेनेला गेल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी तातडीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून संबंधित व्यक्तीची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.

प्रभाग क्रमांक १७३ मधून भाजपच्या तिकिटावर इच्छुक असलेल्या शिल्पा केळुस्कर आणि त्यांचे पती दत्ता केळुस्कर यांनी हा प्रकार केला आहे. पक्षाने इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी एबी फॉर्मचे वाटप केले होते. जागावाटप अंतिम झाल्यानंतर, ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या आहेत, तेथील उमेदवारांचे एबी फॉर्म परत घेतले. मात्र, शिल्पा केळुस्कर यांचे पती दत्ता केळुस्कर यांनी पक्षाकडून मिळालेल्या मूळ एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढली. त्यानंतर मूळ फॉर्म पक्षाकडे परत करून, झेरॉक्स कॉपीच्या आधारे शिल्पा यांचे नाव भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक आयोगाकडे दाखल केले.

ही बाब उघडकीस आल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्वरित पावले उचलली. साटम यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना पत्र लिहून स्पष्ट केले की, शिल्पा केळुस्कर यांना पक्षाच्या नजरचुकीने एबी फॉर्म देण्यात आला होता आणि नंतर तो परतही घेण्यात आला होता. तरीही त्यांनी बनावट म्हणजे डुप्लिकेट फॉर्म दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.

Comments
Add Comment