पंकजा देव
भविष्यामध्ये काय घडेल याचे कुतूहल, भीती, चिंता आणि भय प्रत्येकाला असते. त्यामुळेच भविष्याची काळजी करतो. ही जगभरातील मानवजातीची कथा आहे. त्यामुळेच भविष्यवेत्त्यांचे २०२६ बाबत काय संकेत मिळतात, पाहू या.
२०२५ची अखेर आणि २०२६ ची सुरुवात कालचक्र नव्या वळणावर नेणारी आहे. भविष्याच्या कुशीत काय दडले आहे, याबद्दल जाणून घेण्याची, आडाखे बांधण्याची तसेच अंदाज व्यक्त करण्याची मानवी भावना काही नवी नाही. भविष्याविषयी जाणून घेण्यासंदर्भात प्रसिद्ध असणाऱ्या काही अभ्यासशाखाही आपण जाणतो. यातील तज्ज्ञ, अभ्यासू वा भाकीत वर्तवण्याची ‘शक्ती’ असलेले काही लोक हे काम दरवर्षी करतच असतात. असे असताना नववर्षात पाऊल ठेवताना आपणही भविष्याची चाचपणी करायला काय हरकत आहे? चला तर, २०२६ या वर्षाबद्दल भविष्यसूचक स्फटिकाचा गोळा काय म्हणतो, हे जाणून घेऊ या. जगातील महत्त्वाच्या भविष्यवाण्यांमध्ये प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमस यांच्या भाकितांचा अग्रक्रमाने समावेश होतो. म्हणूनच त्यांच्या भविष्यवाण्यांचे विविध प्रकारे अर्थ लावले गेले आहेत. त्याने सूचित केलेल्या घटनांमध्ये दोन महायुद्धे, हिरोशिमा आणि नागासाकीवर केले गेलेले अणुबॉम्बस्फोट तसेच अमेरिकेतील ९/११ चा दहशतवादी हल्ला यांचा समावेश होता. या सर्व भविष्यवाण्या १५५५ मध्ये लिहिल्या गेल्या होत्या. लेखनाच्या संकेतात्मक भाषेतून त्याचे विविध अर्थ निघू शकतात आणि त्यामुळेच इतिहासकार अनेकदा त्यांच्या भविष्यवाण्यांच्या विश्वासार्हतेवर वादही घालतात. या पार्श्वभूमीवर बघायचे तर २०२६ साठीच्या नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्याही जागतिक पातळीवर लक्षणीय अशांतता दर्शवतात.
काही अभ्यासकांतर्फे असेही सूचित होते की, पुढील काळात हवामान आपत्ती आणि तांत्रिक बदल मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील. दुसरीकडे, बाबा वांगा या एका आदरणीय बल्गेरियन भविष्यवेत्त्याने भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि तीव्र हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या आपत्तींबद्दलच्या भाकितांनिशी हे वर्ष कसे असेल, याचा प्राथमिक अंदाज दिला आहे. यंदा अशा पर्यावरणीय बदलांमुळे जगातील अनेक भागांमध्ये पूर, त्सुनामी आणि इतर अत्यंत गंभीर घटना घडू शकतात आणि त्यामुळे जगभरातील काही प्रदेश आणि क्षेत्रांवर विपरित परिणाम होऊ शकतो, असे सूचित करण्यात आले आहे. २०२६ मध्ये इथिओपिया, अमेरिका, म्यानमार, दक्षिण सुदान, गांबिया, सुदान, रशिया, झांबिया, दक्षिण आफ्रिका आणि थायलंड या देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. असे असताना जगभरातील प्रत्येक शंभर लोकांपैकी अंदाजे सात ते आठ लोक निवडणुकीशी संबंधीत विपरित घटनांमुळे प्रभावित होऊ शकतात, असे दर्शवण्यात आले आहे. यंदा देशात पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी असणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान देत आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक-भाजप युती द्रमुकला सत्तेवरून हाकलून लावण्याचा प्रयत्न करत आहे. केरळमध्ये भाजप सातत्याने ताकद वाढवत असला तरी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि संयुक्त लोकशाही आघाडीमध्येच खरी लढत होईल. आसाममध्ये सध्या भाजप सत्तेत असले तरी आगामी निवडणुकांमध्ये राज्यात प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील.
जगाचा विचार करता सध्या जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अर्थजगताला जोरदार प्रयत्न करावा लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये गुंतवणूक केल्याने परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. मात्र भाकीतांचा अंदाज घेता वेगवेगळी आर्थिक धोरणे आणि उच्च सार्वजनिक कर्जाचे निरीक्षण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. आताच रशिया आणि चीन संसाधनांसाठी स्पर्धा करत आहेत. येत्या काळात त्यांच्यामधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता भविष्यवेत्ते दर्शवतात. सध्याची स्थिती तरी या इशाऱ्यांशी सुसंगत आहे. बल्गेरियन भविष्यवेत्ता बाबा वांगा यांनी देखील आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. २०२६ मध्ये येणारी अपेक्षित मंदी व्यापार तणाव आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांमुळे, विशेषतः विकसित देशांमध्ये वाढत असलेल्या वृद्धांच्या लोकसंख्येमुळे गडद होण्याची शक्यता आहे. ‘गोल्डमन सॅक्स रिसर्च’चा अंदाज आहे की, २०२६ मध्ये बहुतेक प्रमुख अर्थव्यवस्था पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा वेगाने वाढतील. जागतिक व्यापार शुल्कांमधील धक्क्यांमुळे आणि देशांतर्गत धोरणांमुळे २०२६ आणि त्यानंतरच्या आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक दृष्टिकोन प्रभावित राहण्याचा अंदाज आहे. २०४७ पर्यंत विकसित देशाचा दर्जा मिळवण्यासाठी सरकारला देशांतर्गत उत्पादनवाढीला चालना देणे, परकीय गुंतवणूक वाढवणे आणि जागतिक बाजारपेठांमध्ये व्यापार वाढवणे गरजेचे ठरेल. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. २०२६ मध्ये भारताचे परराष्ट्र धोरण शेजारी राष्ट्रांशी जुळवून घेण्याच्या उपक्रमांवर भर देणारे राहील. त्याचबरोबर देश संरक्षण आणि आर्थिक सहकार्य वाढवून ‘क्वाड’द्वारे अमेरिका आणि युरोप, विशेषतः जर्मनीसोबत आपली धोरणात्मक भागीदारी मजबूत करेल. थोडक्यात, भारताचे २०२६ चे परराष्ट्र धोरण दृढनिश्चयी असणार असून विविध देशांशी मजबूत भागीदारी निर्माण करणे, जागतिक नेतृत्वक्षमता वाढवणे आणि जटिल भू-राजकीय परिस्थितीत राष्ट्रीय विकास सुनिश्चित करणे हे असेल.