मोरपीस: पूजा काळे
भले बुरे ते घडून गेले, विसरुन जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर... या वळणावर... कॅलेंडरवरची पान वायूवेगाने पळतात, नव्हे त्यांना पळवणारा कुणी दुसराचं असतो. हा दुसरा म्हणजे कुणी माणूस नसून एकमेव काळ असतो, जो वाऱ्याला धजत नाही, पाण्याला थिजत नाही. त्याच्या एका इशाऱ्याने आपात घडतात. काळाची गणित वेगळी असल्याने त्याला कुठलचं मोजमाप नसल्याने वेगाचा अंदाज बांधणं कठीण होतं. आजच्या दिवसाचं काम उद्या पाहू म्हणणाऱ्याला चित करण्याची किमया कळत असते. आपण त्याला ना हरवू शकत ना कूरघोडी करू शकत. दिवस रात्रीच्या फेऱ्यात आहिस्ता आहिस्ता पावलं टाकत काळ पुढं सरकतो. त्याच्यापुढे आपण कितीही सुज्ञ असल्याचा भाव आणला तरी उपयोग नसतो. घडून गेलेल्या गोष्टीकडे फक्त पाहात राहणं, एवढं आपल्या हाती उरतं. तेल गेलं तूप गेलं अन् हाती राहिलं धुपाटणं याची वानगीदाखल प्रचिती देताना वाईट गोष्टी तो दाखवतो, कधी घडवून आणतो. कधी तो उंचीवर नेतो तर कधी दुःखाच्या खाईत लोटतो. त्याच्यापुढे कुणाचेचं चालत नाही. आज, आता, उद्या, परवा म्हणता म्हणता दिवसाचे चोवीस तास उलटतात. एक दिवस एक महिना एक वर्ष क्षणाक्षणाला निसटून जातं. दिवस रात्रीच्या बंद कुलूपात आपण स्वतःला सुरक्षित समजत असलो तरी, काळ कधी घाला घालेल, उलटवार करेल याचा नेम नसतो. सूर्य उगवताना मावळतीच्या धरेला सोबत घेऊन येतो. सूर्याचे उगवणे, मावळणे चंद्राच्या कला यावर काळाचा अंकुश असल्याने पृथ्वीवर प्रचंड उलाढाली होतात.
काळाचं एक बरं असतं. कुणाच्या अध्यात मध्यात न पडता स्वत:चं काम चोख बजावत चांगल्या वाईट कर्माची फळं चाखायला देतो. असं म्हणतात की, सब्र का फल मिठा होता हैं! पूर्वी हे सब्र वगैरे मानण्यातला माझा स्वभाव नव्हता. झटपट पटापट यावर मी स्वतःला समृद्ध समजत होते. पण वेळ काळाच्या काठीचा आवाज दाखवते या मताशी मी पोहोचलेय. कारण एकचं. इच्छा नावाची अनमोल गोष्ट आयुष्यात आली आणि पूर्तीच्या दृष्टीने पावलं भरभर चालू लागली. प्रथम काळाबरोबर चालणं मुश्किल वाटत होतं पण श्रम, सातत्य, प्रयत्नाची मोट बांधली आणि दारात स्वप्नपूर्तीची लक्ष्मी हासत आली. या वर्षाने पदरातल्या गोष्टींचं सोनं केलं. मनातल्या तीव्र इच्छेवर साहसाचं खोगिर चढवलं. इच्छेला कृतीची जोड मिळाली. इच्छेतून प्रोत्साहन मिळालं. वेळेला ध्येयपूर्ती प्रवाहात इच्छा मारून गरजा कमी केल्या. प्रगतीची वाट धरली. अंतर्मनातली अमर्याद शक्ती ओळखली. माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य वाढवलं. वर्षारंभी आखलेलं इच्छा प्रयोजन वर्षाअखेरीस पूर्णत्वास आलं. यशस्वी होण्यासाठी आत्मिक नव्हे तर बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक सर्व स्वाभाविक इच्छेवर काम केल. इच्छापूर्तीचं हे वर्ष सुख आणि समाधान देऊन गेलं.
प्राप्त इच्छा घेऊन निघालेले मी जुनं सोडून जाताना परिघाच्या पल्याड कडेलोट होतो भावनांचा. घड्याळाच्या काट्यावर उभं राहून तुझ्याबरोबर अगणित नाती-गोती जोडली. सुखदुखाच्या भावना मांडल्या. कधी रडले, कधी हसले. कधी पडता पडता सावरले, कधी सावरताना आपटले, गुंतता हृदय भावनिक झाले. हे प्रभाकरा पाणी आटल्या नयनामध्ये कसे जमावे मोती, दूर किनारी वाहत गेल्या आसवांच्या ज्योती असा सांगावा धाडत या महाकाय सागरात तुला विसर्जित बघण्याचा काळ म्हणजे आम्हासाठी हळवा क्षण. जुन्याला घेऊन, नवस्वागतासाठी सज्ज होताना मनातली हुरहुर कळेल का तुला? ती अनुभवण्याची गोष्ट आहे. वर्ष अखेरीला नवे संकल्प सोडायचे. जुन्या चुका टाळायच्या. प्रगल्भ होताना अवधान बाळगायचं. तू सोडून जाताना, तुला सोडून जाताना या वाक्यांमधे 'सोडून जाताना' यात दुखाची सल आहे. सूर्योदय ते सूर्यास्त या प्रवासात घटका दोन घटका सुखदुःखाच्या मोजत असतो. त्यातला एकेक दिवस म्हणजे जगण्याचा एक साकव, जो प्रश्नांची उकल करतो उत्तर शोधतो. महिने सरतात. वर्ष बोलतात. ऋतू अवतरतात. अधिक वेगाने डिसेंबर येतो तेव्हा घड्याळाची टिकटिक वाढते. काटे वेग पकडतात. सेकंदामधूनी वेळ निसटते, वेगाने धावते. पानगळतीच्या दिवसात जुने हिशोब नव्याने पटावर येतात. कमी, अधिक, चांगल, वाईटचा ग्राफ नजरेसमोर येतो. भावबंध, लागेबंध सळसळून उठतात. त्यावेळी चपळाईने निसटण्याची तुझी कला मला बैचेन करते. तुझ्या अस्तानिशी उभारी घेऊ शकणार नाहीत अशी नाती, गोती, मैत्रैय अस्त पावलेले असतात. तू उद्याची स्वप्न घेऊन येतोस. पण मनातली जळमट जायला किती काळ जाईल सांगता येत नाही. आपलं काहीही नसतं हे कळायला सुद्धा वय निघून जातं. परके आपले आणि आपले परके होतात. इथं एक वर्ष काय देत, यापेक्षा काय हिरावून नेत हे महत्त्वाचं. वर्षाच्या समाप्तीला नववर्षाची सुरुवात म्हणजे आठवणी ठेवून जाव्यात की घेऊन जाव्यात. नववर्ष स्वागत म्हणजे सुख स्वीकारण्याचा काळ. नव्या ताकदीने अभिव्यक्त होण्याचा काळ. वाहत्या पाण्याकडून शिकण्याचा काळ. सुरकुतल्या चेहऱ्याकडून समजून घेण्याचा काळ. काय घ्यावं, काय न्यावं, काय शिलकीत ठेवावं, काय वाटून द्यावं या पलीकडे अस्ताला टिकटिक करणारी शेंदरी सायंकाळ सरत असते. निसटतो क्षण न् क्षण झरझर सेकंदातूनी. आठवांचे उमाळे पाझरती हृदयातूनी. कप्पा कप्पा साठलेला रिक्त केला. जीवनाकडे बघण्याचे तू मर्म देऊनी गेला. पंचविसाव्या उजेडात सव्वीसाव प्रसवावं. मोकळ्या श्वासासाठी आयुष्य जगावं. तुला सोडून जाताना २०२५ हळवं झालयं. मुक्त केलयं भावनांना. अंतर्मनातला आवाज मात्र ऐकू येतोय. आता सक्षम होत जास्तीत जास्त काम करायचंय. शब्दांचा जिवंतपणा जपून भवताली शब्दसामर्थ्याचे झरे वाहू द्यायचेत. सिद्द करण्यासाठी मनात खूणगाठ पक्की केलीयं. आठवणीमध्ये अंतरंग तेवत ठेवेन. असेन मी नसेन मी, परी तुला कळेन मी. येणाऱ्या काळात रस्ते, वळणं अवघड असली तरीही, मार्गक्रमण करत रहायचयं उद्याचा सूर्योदय पाहण्यासाठी. कारण निरोप घेऊन तू जातोस, पण थोडासा इथेचं राहतोस.