२९ महापालिकांतील लढतींचे चित्र स्पष्ट
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय युती आणि आघाड्यांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. काही महापालिकांमध्ये महायुती (भाजप- शिवसेना) एकत्र लढत असताना, अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, मनसेच्या प्रभावामुळे मुस्लीम आणि उत्तर भारतीय मतदार दुरावण्याच्या भीतीने काँग्रेसने उबाठाशी अधिकची सलगी टाळली आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करीत दलित आणि मुस्लीम मतांचे गणित जुळवण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. अनेक ठिकाणी ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने नाराजीचे सूर उमटले, तर पक्षांतर करून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याने अंतर्गत असंतोष उफाळून आला. एकूण २९ पैकी सुमारे १४ महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असून, यामुळे निवडणुका अधिक चुरशीच्या आणि बहुरंगी होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला अंतिम झाला असून, भाजप १३७, तर शिवसेना ९० जागा लढवणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर सुमारे ६५ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील अनेक उमेदवार मुस्लीम समाजातील असल्याने काँग्रेस आणि उबाठाला फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उबाठा १६३ तर मनसे ५३ जागांवर रिंगणात आहे. त्यांनी शरद पवार गटाला ११ जागा सोडल्या आहेत. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून सुमारे ६२ जागा वंचितला दिल्या आहेत. समाजवादी पार्टी, एमआयएम आणि रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानेही स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने मुंबईत बहुरंगी लढती होणार आहेत.
ठाण्यात महायुती कायम
ठाणे महापालिकेतील महायुतीच्या जागावाटपाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर फॉर्म्युला निश्चित झाला असून, शिवसेनेने ८७, तर भाजपने ४० जागा लढवण्याचे ठरले आहे. आनंद आश्रम येथे झालेल्या मॅरेथॉन बैठकीत श्रीरंग आणि नौपाडा प्रभागांवरून सुरू असलेला वाद सोमवारी रात्री मिटला. या पालिकेत राष्ट्रवादी अजित पवार स्वबळावर ७५, काँग्रेस १००, उबाठा ५३, मनसे ३४ आणि शरद पवार गट ३६ जागा लढवत आहे.
नवी मुंबईत महायुती तुटली
नवी मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील सुप्त संघर्षामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. उबाठा, मनसे आणि शरद पवार गटाची युती झाली असून, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस स्वबळावर लढत आहेत.
कल्याण-डोंबिवलीत चौरंगी लढत : कल्याण-डोंबिवली महापालिकेत महायुतीत शिवसेना ६६, तर भाजप ५६ जागा लढवणार आहे. अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडून ४२ जागा लढवत आहे. मनसे आणि उबाठा युतीत मनसे ५४, तर उबाठा ६८ जागा लढवत आहेत. काँग्रेस, शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आली असून, काँग्रेस ५८, शरद पवार गट ३५ आणि वंचित १५ जागा लढवत आहेत.
मीरा-भाईंदरमध्ये महायुती नाही : मीरा-भाईंदर पालिकेत महायुती तुटली असून, भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढत आहेत. काँग्रेसने एकटे लढण्याची घोषणा केल्याने उबाठा, मनसे आणि शरद पवार गट एकत्र आले आहेत.
पनवेलमध्ये महायुती मजबूत
पनवेल महापालिकेत भाजप, शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) युतीत आहेत. जागावाटपात भाजप ७१, शिवसेना ४, राष्ट्रवादी २ आणि आरपीआयच्या वाट्याला १ जागा आली आहे. विरोधात शेतकरी कामगार पक्ष, उबाठा, शरद पवार गट, काँग्रेस, मनसे, समाजवादी आणि वंचितची महाविकास आघाडी आहे.
वसई-विरारमध्ये अनोखी समीकरणे
वसई-विरार महापालिकेत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहेत. उबाठाने स्वबळाचा नारा दिला असून, काँग्रेस आणि मनसेने बहुजन विकास आघाडीसोबत आघाडी केली आहे. मात्र, बहुजन विकास आघाडीच्या डझनभर उमेदवारांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्यासमोर अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न आहे.
तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक
- उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ जवळ येत असताना अनेक इच्छुकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांची मदत घ्यावी लागली.
- छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने तिकीट नाकारल्याने इच्छुकांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर ठिय्या दिला. नासेर सिद्दिकी नामक इच्छुकाने जलिल यांना शिव्यांची लाखोली वाहत १५ लाखांमध्ये तिकिटे विकल्याचा आरोप केला.
- अकोला शहरात तिकीट न मिळाल्याच्या नाराजीमुळे भाजपच्या इच्छुक शकुंतला जाधव यांनी निवडणूक प्रभारी, माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी गोंधळ घातला.
- छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा गोंधळ झाला. एका महिलेला तिकीट न मिळाल्याने ती थेट पेट्रोल घेऊन आत शिरली आणि आत्मदहनाचा इशारा दिला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
- नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) कार्यकर्त्यांना एबी फॉर्म न मिळाल्याने कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्याची घटना घडली. अविनाश पारडीकर असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.
- पुण्यातून उमेदवारी नाकारल्याने उबाठाच्या नाराज कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुखांचे पोस्टर्स फाडल्याची घटना उघडकीस आली.






