मायभाषा: वीणा सानेकर
प्रत्येक आई बाबांना एक अतिशय महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो आणि तो म्हणजे मुलांना शाळेत घालायचा निर्णय. शाळा म्हटले की, कोणत्या माध्यमात त्यांना घालायचे हा कळीचा मुद्दा. मुलीला जेव्हा शाळेत घालायची वेळ आली तेव्हा तिने मराठी माध्यमात शिकणे हेच नैसर्गिक आहे, या विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयातून माझी मुलगी मराठीत शिकू लागली नि इंग्रजी बोलणे वा लिहिणे, याबाबत तिला कोणतीही अडचण आली नाही. एक- दोन मुले सोडली तर आमच्या जवळपास कुणीही मराठीत शिकत नव्हते. २००२ पासून हा मराठी शाळांचा विषय माझे आयुष्य व्यापून राहिला आहे.
आयुष्यातली उमेदीची वर्षे या प्रश्नाला वाहून काम केले. गेली पाच सहा वर्षे मात्र मराठी शाळांच्या विषयाने मन अधिकच अस्वस्थ आणि मुख्य म्हणजे निराश झाले. हा विषयच समाजाला नि मराठी माणसांना आपला वाटेनासा झाला आहे हे दिसत होते. केवळ कार्यकर्त्यांच्या आंदोलनानी जाग येणार आहे का? तर नाही. मराठी शाळांकडे शासनाने पाठ फिरवली नि हीन दिन झालेल्या शाळा नकोत म्हणून पालकांनी त्यांना आयुष्यातून बाद केले. आता काळ उलटा फिरवून चुका दुरुस्त करता येतील का, तर ते शक्य नाही. स्वतः जी पिढी इंग्रजी शाळांमध्ये शिकली नि शिकते आहे, ती आपल्या मुलांना एकदम भावनिक होऊन मराठी शाळेत शिकवेल का? असे स्वप्नरंजन करणे मनाला समाधान देते पण वास्तव वेगळच आहे नि त्याच्यापासून पळता येणे शक्य नाही.
सरत्या वर्षाला एका बातमीने लक्ष वेधून घेतले. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी माध्यम आणि मराठी शाळा या विषयावरील ‘क्रांतिज्योती विद्यालय’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. खूप वर्षे मनात होते की नाटक, चित्रपट, एकांकिकांच्या, कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी शाळांचा विषय समाजासमोर यावा. ‘हिंदी मिडीयम’ नावाचा चित्रपट काही वर्षांपूर्वी पाहिला तेव्हापासून तर मराठी शाळांसाठी काही विषय का सुचत नाही असे राहून राहून वाटत होते. मग लक्षात आले, कुठले निर्माते हा विषय घेऊन चित्रपट काढणार?
आता हे घडतंय ही गोष्ट मराठी शाळांमध्ये जीव गुंतलेल्या माणसांना दिलासा देणारी आहे. शाळा हा प्रमुख विषय आहेच पण मायभाषेचा विचार अनेक अंगांनी करायला लागणार आहे. आंदोलनांपासून सकारात्मक अथवा रचनात्मक कामांपर्यंत सर्व पैलूंचा विचार करावा लागणार आहे. मुख्य म्हणजे तरुणाई आपल्या भाषेकडे कशी पाहते हे महत्वाचे आहे. मराठीचे पुढल्या काळातील स्वरूप कसे राहील याचा कृतिशील विचार सर्वांनाच करावा लागणार आहे. शासन, राजकीय पक्षांपासून सामान्य माणसापर्यंत सर्वांनाच!
वर्ष संपत आले की, आपण ताळेबंद मांडतो, चांगल्या वाईटाचा, यशापयशाचा, हरवल्या- गवसल्याचा, जिंकल्या - हरल्याचा. १९६० म्हणजे आपल्या राज्य स्थापनेपासून आजतागायत इतकी वर्षे झाली मायभाषेच्या प्रश्नांचा, तिच्या विकासाचा आणि जोपासनेचा आपण काही जमाखर्च मांडला का? काही संकल्प केला का? आपली भाषा आपल्याला किती हवी आहे हे सरत्या वर्षाला स्वतःला विचारणे आणि ती सोबत हवी असेल तर तिचे पांग फेडणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे, हे मान्य केले तरी माझ्या या सदराचे सार्थक होईल.