Wednesday, December 31, 2025

रायगडमध्ये जड-अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदी

रायगडमध्ये जड-अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदी

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अधिसुचना

अलिबाग : ३१डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून रायगडमध्ये जड-अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदी अधिसुचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. खारपाडा ते कशेडी, माणगाव-ताम्हाणी घाटमार्गे दिघी, कर्जत-पळसदरी-खोपोली-पालीफाटा-वाकण, वडखळ-अलिबाग, चौकफाटा-कर्जत राज्यमार्ग, अलिबाग-मुरुड राज्यमार्ग व अलिबाग-मांडवा या महामार्ग व राज्यमार्गांवरून ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांसाठी या मार्गावर ही बंदी राहणार आहे.

रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने ३१ डिसेंबर रोजी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड, कर्जत, माथेरान, खालापूर, इमॅजिका, पाली, महड, रायगड किल्ला अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपआपली वाहने घेऊन येत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून, त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक बंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जीवनाश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिकांना लागू राहणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत वाहन चालकांनी पर्यायी नियोजन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment