Thursday, January 1, 2026

कल्याण - डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं: भाजपाची विजयाची हॅट्रिक

कल्याण - डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं: भाजपाची विजयाची हॅट्रिक
ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच भाजपाला मोठे यश मिळाले आहे. पॅनल क्रमांक २६ बी मधून भाजपच्या उमेदवार रंजना मितेश पेणकर या बिनविरोध निवडून आल्या असून, त्यामुळे शहरात भाजपाने विजयाची हॅट्रिक साधली आहे. रंजना पेणकर यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीदरम्यान बाद झाला. उद्धव ठाकरे गट आणि मनसे आघाडीनेही या पॅनलमध्ये उमेदवार न दिल्याने पेणकर यांचा विजय निश्चित झाला. कल्याण-डोंबिवलीत बिनविरोध निवडून येणाऱ्या पेणकर या तिसऱ्या भाजप उमेदवार ठरल्या आहेत. याआधी आसावरी केदार नवरे आणि रेखा चौधरी या देखील भाजपच्या उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. आसावरी नवरे यांनी पॅनल क्रमांक २६ (क) मधून खुल्या प्रवर्गातून विजय मिळवला, तर रेखा चौधरी या पॅनल क्रमांक १८ (अ) मधून निवडून आल्या. नवरे यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागा असून, यंदा सत्तारुढ भाजप-शिवसेना युती निवडणूक लढवत आहे. यामध्ये शिवसेना ६६ तर भाजप ५६ जागांवर निवडणुकीत उतरली आहे. महायुतीतून बाहेर पडलेला अजित पवार गट ४२ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. सत्तारुढ युतीसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आघाडीचे आव्हान आहे. या आघाडीत उबाठा गट ६८ तर मनसे ५४ जागांवर निवडणूक लढवत आहे. दरम्यान, सत्तारुढ आणि विरोधी आघाडीत बंडखोरीचे सावट दिसत असून, नाराज उमेदवारांची मनधरणी सुरू आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरच सर्व प्रभागांतील चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >