- प्रा. जयसिंग यादव अफगाणिस्तानमधील बगराम एअरबेस पुन्हा ताब्यात घेण्याची भाषा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच केली. अमेरिकेचे अनेक देशांमध्ये हवाई तळ असून, त्या माध्यमातून हा देश जगातील अनेक देशांवर नियंत्रण ठेवत असतो. ट्रम्प यांनी एअरबेस ताब्यात घेण्यासाठी अप्रत्यक्ष युद्धाचा इशारा दिला; परंतु भारत, पाकिस्तान, चीन आणि रशियाने त्याला कडाडून विरोध केला. काय आहे या एअरबेसचे गौडबंगाल?
भारताने अद्याप तालिबानशासित अफगाणिस्तानला अधिकृतपणे मान्यता दिली नसली, तरी तो मानवतावादी आणि विकासात्मक मदत देत आहे. भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध वैदिक काळापासून आहेत. कारण गांधार हा एके काळी भारताचा भाग मानला जात होता. अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीत भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताने तालिबानला मान्यता दिली नसली, तरी नेहमीच मानवतावादी मदत दिली आहे. भारताने तेथे रस्ते, धरणे, शाळा, रुग्णालये आणि संसद भवन बांधले आहे. तालिबानची राजवट असूनही भारताने अन्नधान्य, औषधे, भूकंप मदत, कोविड लस आणि इतर आवश्यक साहित्य पाठवून अफगाणिस्तानशी चांगला शेजारधर्म निभावला आहे. तालिबानला हेदेखील समजले आहे, की भारतापासून अंतर राखणे व्यावहारिक नाही आणि भारत आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी तालिबानशी संबंध राखण्यास उत्सुक आहे. विश्वासाचे संबंध असताना भारत आणि अफगाणिस्तानमध्ये जाणीवपूर्व गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. भारताने तालिबान राजवटीकडे कधीही बगराम एअरबेसची मागणी केली नाही, ना अफगाणिस्तानने ते भारताच्या ताब्यात देण्याचे सूतोवाच केले; परंतु अफगाणिस्तान अमेरिकेला बगराम एअरबेस द्यायला विरोध करत असताना भारताला देण्यास मात्र तयार असल्याचे वातावरण तयार करण्यात आले. त्याचा अफगाणिस्तानने लगेच इन्कार केला. याबाबत तालिबान अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, की भारताने अफगाणिस्तानमधील बगराम एअरबेसवर देण्याची विनंती केलेली नाही किंवा ऑफरही दिलेली नाही. अफगाण अधिकाऱ्यांनी असे दावे बनावट असल्याचे सांगत फेटाळून लावले. वस्तुत: भारताच्या सध्याच्या अफगाण प्रशासनाशी असलेल्या भागीदारीवर काही विशिष्ट गटांकडून शंका उपस्थित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. बगराम एअरबेस अमेरिकेने विकसित केला होता आणि अफगाणिस्तानमधील वीस वर्षांच्या लष्करी मोहिमेदरम्यान एक प्रमुख एअरबेस म्हणून काम केले होते. अमेरिका या एअरबेसवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्प यांनी उघडपणे तशी इच्छा व्यक्त केली आहे आणि हे साध्य झाल्यास परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तथापि, अफगाण तालिबानने ट्रम्पची मागणी स्पष्टपणे नाकारली आहे. अफगाण लोक धमक्यांना घाबरत नाहीत; उलट आम्ही आणखी २० वर्षे लढण्यास तयार आहोत, असे खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. जंग जंग पछाडूनही अमेरिकेला अफगाणिस्तान जिंकण्यात कधीही यश आले नाही. उलट, अमेरिकन सैन्याच्या नाराजीमुळे तर ज्यो बायडेन यांच्या काळात अमेरिकेला तिथून आपले सैन्य मागे घ्यावे लागले होते. अमेरिका, चीन आणि पाकिस्तान या सर्वांचे लक्ष बगराम एअरबेसवर आहे. अमेरिका या एअरबेसवर पुन्हा नियंत्रण मिळवू इच्छित आहे, मात्र ते चीनच्या अणु प्रयोगशाळेपासून अगदी जवळ आहे. ते पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि बलुचिस्तानपासूनही जवळ आहे. शिवाय, ते संपूर्ण मध्य आशियामध्ये प्रवेश प्रदान करते. अलिकडेच अफगाण तालिबानने हा एअरबेस भारताला सोपवल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरली. तथापि, अफगाण सरकारी अधिकाऱ्यांनी हे वृत्त निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. चीनची सर्वात जवळची अणु प्रयोगशाळा बगराम एअरबेसपासून २००० किलोमीटर अंतरावर, वायव्य चीनमधील लोप नूर नावाच्या परिसरात आहे. हे अंतर रस्त्याने किंवा इतर मार्गांनी अनेक तासांचे असू शकते. तथापि, लॉकहीड एसआर-७१ ब्लॅकबर्डसारखी आधुनिक लष्करी विमाने ते सुमारे एका तासात पार करू शकतात. पाकिस्तान, तुर्कस्तानसह अन्य काही देशांनी विरोध केल्यानंतर भारताला अलिकडेच आपला देशाबाहेरचा जगातला एकमेव असा ताजिकिस्तानमधील आयनी एअरबेस सोडावा लागला. ताजिकिस्तानमधील हवाई तळ भारतासाठी महत्त्वाचा होता; परंतु तो गमवावा लागल्यानंतर भारताला दुसऱ्या हवाई तळाची गरज आहे. असे असले, तरी भारत कोणावर दबाव आणून पदरात काही पाडून घेईल, असे नाही. दोन्ही राष्ट्रांना तशी गरज वाटली आणि त्यात दोघांचा फायदा आहे, याची खात्री पटली, तरच बगाराम एअरबेसबाबत निर्णय होईल. बगराम एअरबेस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताने मध्य आशियातील आपला ताबा कायम ठेवला पाहिजे. मुख्यतः इराणच्या चाबहार बंदरात भारताने पन्नास अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानच्या कोणत्याही नापाक कृतींना त्वरित प्रत्युत्तर देण्यात भारताला या तळाची मदत होणार आहे. तथापि, पाकिस्तानला नेहमीच भीती राहील की अफगाणिस्तानच्या माध्यमातून भारताकडून धोका होऊ शकतो. भारताने बगराम एअरबेस ताब्यात मिळण्यासाठी व्यूहात्मक पावले टाकताना मित्रराष्ट्र दुखावणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. येथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे बगराम एअरबेस दुसऱ्या देशाच्या ताब्यात जाता कामा नये. तसा तो गेला, तर भारतासाठी आणि संपूर्ण प्रदेशासाठी डोकेदुखी ठरेल. अफगाणिस्तानमधील पुनर्बांधणीच्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे, म्हणून सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे बगराम ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारताने हा हवाई तळ तालिबानकडून मिळवावा. भारताचे अफगाण तालिबानशी उत्तम संबंध आहेत. अलिकडेच अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारताला भेट दिली आणि तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंधांना एक नवी झळाळी मिळाली आहे. अफगाणिस्तानने अलिकडेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान राजवट लवकरच भारतात एका राजदूताची नियुक्ती करणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होतील, असे मानले जाते. गेल्या महिन्यात अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आठ दिवस भारतात होते, तेव्हा पाकिस्तानने अफगाणिस्तानचे निर्णय दिल्लीतून होतात, अशी टीका केली होती. याचा अर्थ अफगाणिस्तान भारत सरकारच्या सांगण्यानुसार कारभार करते आहे, असा होतो. भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध सुधारत असताना तालिबान आणि भारतात कटुता निर्माण व्हावी, असा काहींचा प्रयत्न आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘सोशल मीडिया’ आणि काही आंतरराष्ट्रीय पोर्टलवर अफगाणिस्तानचा बगराम एअरबेस भारताला सोपवल्याच्या बातम्या वेगाने पसरत होत्या. या बातमीने दक्षिण आशियातील राजकीय घडामोडींबद्दलच्या अटकळींना उधाण आले होते; पण आता अफगाण तालिबान प्रशासनाने या सर्व अटकळींना पूर्णविराम दिला आहे. अफगाणिस्तानचा बगराम एअरबेस हा देशातील सर्वात मोठा आणि सर्वात आधुनिक लष्करी हवाईतळ आहे. राजधानी काबूलच्या उत्तरेला सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेले हे शहर १९८० च्या दशकापासून अफगाण लष्करी कारवायांचे केंद्र आहे. ते मूळतः सोव्हिएत सैन्याने विकसित केले होते आणि नंतर २००१ मध्ये अमेरिकेने त्याचे नियंत्रण आपल्याकडे घेतले आणि ते आधुनिक हवाई तळात रूपांतरित केले. अमेरिकन सैन्याने सुमारे वीस वर्षे एक प्रमुख तळ म्हणून बगराम आपल्याकडे ठेवले. ते केवळ अफगाणिस्तानच नव्हे, तर पाकिस्तानच्या सीमेवरही लक्ष ठेवत होते. बगराम हा अमेरिकेचा सर्वात मोठा हवाई तळ होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडील ब्रिटन भेटीदरम्यान सांगितले होते, की बगराम जगातील सर्वात मोठ्या हवाई तळांपैकी एक आहे आणि आम्ही ते परत दिले. आता आम्हाला हा तळ परत मिळवायचा आहे. कारण चीन जिथे आपली अण्वस्त्रे बनवतो, तिथून ते फक्त एक तासाच्या अंतरावर आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. परिणामी बगराम आशियाच्याच नव्हे, तर अवघ्या जगाच्या नजरेमध्ये आला. (लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत.)






