मनसेमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश
कल्याण : कल्याण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आणि माजी शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांना निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाराज झालेल्या समेळ यांनी आपल्या ५० पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेकडून (शिंदे गट) मंगळवारी सामुहिक राजीनामा दिला. समेळ यांनी मागील पंधरा वर्ष कडोंमपात नगरसेवक म्हणून काम पाहिले असून, प्रभावी नेतृत्व, अभ्यासपूर्ण मांडणी आणि विकासकामांसाठी ओळख आहेत. त्यांनी अपेक्षा केली होती की त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना उमेदवारी मिळेल, मात्र पॅनल क्रमांक ९ मधून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी ही कठोर पावलं उचलली.
समेळ म्हणाले, “काहींनी स्वार्थासाठी आपल्या विषयी चुकीची माहिती नेत्यांना दिली असेल, त्यानुसार आपली उमेदवारी कापण्यात आली असेल तर ते चुकीचे आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी याचा विचार करावा. आपण उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि निषेध म्हणून आपल्या पदाधिकाऱ्यांसह राजीनामा देत आहोत.”
डोंबिवली : डोंबिवलीतील आजदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शिवसेना (शिंदे गट) शाखाप्रमुख जयंता दत्तु पाटील आणि त्यांची कन्या काजल जयंता पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने तात्काळ मनसेत प्रवेश करून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पाटील कुटुंबासोबत ५००हून अधिक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक १९ मधून जयंता आणि काजल यांनी अर्ज दाखल केला तर पॅनल क्रमांक २२ मधून संदेश पाटील यांनीही मनसेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली.






