अलिबाग : मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्यावर कारवाईसाठी विरोधक आक्रमक झाले असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांना तडीपार करण्याची मागणी निवेदनाद्वारे महाडमधील लोकप्रतिनिधींनी शिष्टमंडळाद्वारे रायगड पोलीस अधिक्षक यांच्याकडे सोमवारी केली.
महाड नगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या दिवशी विकास गोगावले यांच्याकडून सुशांत जाबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. ज्यामुळे मतदारांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर विकास गोगावले यांच्यावर यापूर्वी अन्य तीन गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात आहे. ज्यात महाड शहर पोलीस ठाण्यात दोन, तर गोरेगाव पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याचा समावेश आहे. या चार गुन्ह्यांची दखल घेऊन त्यांना तडीपार करण्याची मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. जानेवारी २०२६ या महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास गोगावले यांच्याकडून या निवडणुकीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.आगामी निवडणुका शांततापूर्ण आणि निष्पक्षपणे पार पाडण्याच्या दृष्टीने विकास गोगावले यांच्यावर निवडणुका होईपर्यंत हद्दपार करावे, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.