Wednesday, December 31, 2025

रामदास आठवले यांचे बंड २४ तासांत झाले थंड - मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; भाजप-शिवसेना कोट्यातून १२ जागा मिळणार असल्याचा दावा

रामदास आठवले यांचे बंड २४ तासांत झाले थंड - मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; भाजप-शिवसेना कोट्यातून १२ जागा मिळणार असल्याचा दावा

मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या जागावाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत महायुतीला धक्का देणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे बंड अवघ्या २४ तासांत थंड झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी माघार घेतली असून, भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) किमान १२ जागा सोडण्याचे ठरल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी वर्षा निवासस्थानाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, आरपीआयने महायुतीकडे १७ जागांची अंतिम यादी सादर केली. त्यापैकी भाजपच्या कोट्यातील ६-७ आणि शिवसेनेच्या कोट्यातील ६-७ अशा एकूण १२ जागा सोडण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी संमती दिली आहे. याबाबत फडणवीस यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांना निर्देश दिले आहेत. शिवसेना कोट्यातील उर्वरित जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे.

या १२ जागांवर आरपीआयचे उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून लढतील आणि तेथील भाजप-शिवसेना उमेदवार माघार घेतील. उर्वरित १८ जागांवर (आरपीआयच्या ३० पैकी) स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत होईल. मुंबईच्या एकूण २२७ जागांपैकी उर्वरित १९७ जागांवर आरपीआय महायुतीचा घटकपक्ष म्हणून प्रचार करेल आणि महायुती उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा