सुट्टीच्या दिवसांत प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ
नवी मुंबई : देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील नवा मानबिंदू ठरलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने कार्यान्वित होताच यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विमानतळ सुरू झाल्याच्या पहिल्या पाचच दिवसांत तब्बल २६ हजार २१ प्रवाशांनी येथून प्रवास केला असून, प्रवाशांचा हा उदंड प्रतिसाद विमानतळाच्या भविष्यातील यशाची नांदी मानला जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या पाच दिवसांत एकूण २६,०२१ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
यामध्ये १२,४३१ आगमन आणि १३,५९० प्रस्थान प्रवाशांचा समावेश आहे. विमानतळाच्या उद्घाटनानंतर लगेचच प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र असून, मागणी सातत्याने वाढत असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांत प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली. शनिवारी ५,५४८ तर रविवारी ५,६१४ प्रवाशांनी प्रवास केला. या कालावधीत विमानतळावर एकूण १६२ नियोजित हवाई वाहतूक हालचाली नोंदवण्यात आल्या. यामध्ये ८१ आगमन आणि ८१ प्रस्थान उड्डाणांचा समावेश होता.
नवी मुंबई विमानतळाने घेतलेली ही झेप मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची पसंती
शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांत विमानतळावर प्रवाशांचा ओघ सर्वाधिक होता. शनिवारी ५,५४८, तर रविवारी ५,६१४ प्रवाशांनी विमानतळाचा वापर केला. विमानतळाच्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि मुंबई-पुण्याशी असलेली उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे प्रवाशांकडून या विमानतळाला पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.






