दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
आई हे नातंच फार विलक्षण आहे. आपलं तान्ह बाळ भुकेने व्याकूळ झालं असेल म्हणून भयाण रात्री डोंगरकडा पार करणारी हिरकणी आणि आपल्या मुलाची पाण्याची भीती घालवण्यासाठी मुलाला पाण्यात ढकलून द्या म्हणणारी श्यामची आई या खऱ्या अर्थाने मातृत्वाचं प्रतिक आहे. अशीच एक तामिळनाडूमधील आई आपल्या मुलाला एका तांत्रिक अभ्यासक्रमाला पाठवू इच्छित होती. पण खूप शोधल्यानंतर तिला अभ्यासक्रम तिच्या छोट्या शहरात सापडला नाही तेव्हा ती स्वतःच शिकली आणि इतर मुलांना शिकवण्यासाठी इंस्टिट्यूट सुरू केले. ही गोष्ट आहे एडयू सीड- कोडिंग आणि मॅथच्या संस्थापक ससी धरानी यांची.
काही वर्षांपूर्वी ससीचा मुलगा दुसऱ्या इयत्तेत गेला तेव्हा ससीला वाटले आपल्या मुलाने कोणतंतरी एक नवीन कौशल्य शिकावे. ती त्यासाठी पर्याय शोधत होती. त्यावेळी तिने एका व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये एका लहान मुलीचा रोबोट बनवतानाचा व्हिडिओ पाहिला. ससीला ते मनोरंजक वाटले. आपल्या मुलानेही तेच शिकावे अशी तिची इच्छा होती. ती राहत असलेल्या विरुधुनगरच्या आसपास रोबोटिक्स वर्गांचा तिने शोध घेतला. परंतु तिला असा एकही शिकवणीचा वर्ग सापडला नाही. आपल्या सारख्या या छोट्या शहरात आधुनिक शिक्षणाच्या संधी एवढ्या मर्यादित आहेत का? हा प्रश्न तिला पडला. तिला वाटले, असा आधुनिक शिक्षण देणारा वर्ग आपण का सुरू करू नये? ती त्या शहराची आणि काळाची देखील गरज होती. खऱ्या अर्थाने एडयूसीडच्या सुरुवातीची ती ठिणगी होती.
मनातला विचार प्रत्यक्षात उतरवण्याचा ससीने निश्चय केला. तिने काही ठिकाणी भेट दिली. रोबोटिक क्षेत्रातील लोकांना ती भेटली, सूचना लक्षात घेतल्या. या क्षेत्राचा बारकाईने अभ्यास केला. एका विद्यार्थ्यांह एकाच वर्गातून एडयूसीडची सुरुवात झाली. अल्पावधीत ते एक भरभराटीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म बनले. लाईव्ह क्लासेसद्वारे ७०० विद्यार्थ्यांना STEM अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अशी कौशल्ये शिकवली आहेत. शालेय कार्यशाळांद्वारे आणखी १,००० विद्यार्थ्यांपर्यंत एडयूसीड पोहोचले आहे. तसेच ५०,००० तासांहून अधिक अध्यापन केले आहे. या उपक्रमाद्वारे लहान शहरांमधील २० हून अधिक महिलांना प्रशिक्षित करून एडयूसीडमध्ये सामील करण्यात आले आहे. भारत, अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया, ब्रुनेई दारुस्सलाम, जर्मनी, डेन्मार्क, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, स्वित्झर्लंड, इटली, युएई, कतार, कुवेत, सौदी अरेबिया, ओमान, बहरीन, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि जपानमधील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी एडयूसीडने ३५००० तासांहून अधिक लाइव्ह सत्रे आयोजित केली आहेत.
या विद्यार्थ्यांपैकी बरेच जण लहान शहरांमधून आणि सामान्य पार्श्वभूमीतून आले आहेत. काहीजणांच्या कुटुंबामध्ये तर रोबोट हा प्रकारच माहित नव्हता. अशा मुलांनी जागतिक कोडिंग आव्हाने जिंकली आहेत. काही अविश्वसनीय प्रकल्प उभारले आहेत. या साऱ्यांचं श्रेय ससी तिच्या सोबतच्या महिलांच्या टीमला देते. या महिलांपैकी प्रत्येकजण तिसऱ्या श्रेणीतील शहरातून येतात. या महिलांनी स्वतःला प्रशिक्षित केले आहे, कौशल्य विकसित केले आहे. आता त्या पुढच्या पिढीला शिकवतात. त्यांना मार्गदर्शन करतात.
अलीकडेच, एडयूसीडने शालेय विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेला एआय अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमामुळे त्यांना भविष्यासाठी तयार कौशल्ये मिळविण्यास मदत होते. या ऑनलाइन वर्गांमुळे ससी यांच्या एडयूसीडने एक सिद्ध केले आहे की, भौगोलिक मर्यादा नवीन कौशल्ये शिकण्यास अडथळा नाहीत.
हा बदल घडवण्याचा संस्कार ससीवर घरातूनच झाला. तिच्या कुटुंबियांचा मसाल्यांच्या व्यापार होता. ससीला काम करण्याची प्रेरणा आजोबांकडून मिळाली. वयाच्या ५५ व्या वर्षी, जेव्हा प्रत्येकजण निवृत्तीचा विचार करतो, तेव्हा तिचे आजोबा विविध देशांमध्ये निर्यात सुरू करण्याचा विचार करत होते. त्यांना २००० किमी दूर उत्तर भारतात स्थलांतर करावे लागले. नवीन शहर, नवीन भाषा, नवीन लोक असं सारं काही नवीन असताना त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले. व्यापारावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या चिकाटीमुळे त्यांना दहा वर्षांहून अधिक काळ स्पाइसेस बोर्डाकडून भारतातील सर्वात मोठा धने मसाल्याचे निर्यातदार म्हणून पुरस्कार मिळाला.
लहानपणापासूनच ससीला शैक्षणिक विषयांबद्दल आवड होती. शिक्षण ही तिची आवड बनली आहे. एडयूसीडच्या माध्यमातून सर्व प्रदेशातील मुलांसाठी दर्जेदार STEM अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षण उपलब्ध करून देण्याचा ती प्रयत्न करते. स्वतःच्या मुलासाठी एक लहान उपक्रम म्हणून सुरू झालेली ही मोहीम आता एका ध्येयात बदलली आहे. मुलांना कोडिंग, गणित आणि रोबोटिक्सद्वारे सर्जनशीलपणे विचार करण्यास मदत करत आहे.
तिच्याकडे लहान शहरांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातून त्यांच्या तंत्रज्ञान निर्मिती सादर केल्या आहेत. त्यांचे स्वतःचे गेम कोड तयार केले आहेत. वेबसाइट तयार केल्या आहेत. योग्य पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळाले तर लहान शहरांमधील अनेक शिक्षक, पालक आणि बदल घडवणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.
"जसे माझे आजोबा सर्व अडचणींविरुद्ध लढून त्यांचे स्वप्न पूर्ण करत होते, तसेच मला वाटते की प्रत्येक मूल, ते कुठूनही आले असले तरी, शिकण्याची, वाढण्याची आणि यशस्वी होण्याची संधी मिळण्यास पात्र आहे." असे ससीला वाटते.
आई हे नवनिर्माणाचे माध्यम आहे. ती बाळाला जन्म देते. त्याचप्रमाणे आपल्या संस्काराने एक चांगली पिढी सुद्धा घडवते. ससी या अर्थाने आदर्श माता आहे.