Wednesday, December 31, 2025

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील तहशतवादी तळ उध्वस्त केले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष पेटला होता. हा संघर्ष संपवण्यात मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र भारताने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. दरम्यान यानंतर आता चीनने देखील आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यात या संघर्षाच्या काळात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. भारताने चीनचा दावा देखील पूर्णपणे फेटाळून लावला असून शस्त्रविरामाच्या निर्णयामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑपरेशन सिंदूर नंतर १० मे रोजी दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेश्न्समध्ये (डीजीएमओ) थेट चर्चा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम जाहीर करण्यात आला, असे भारताकडून वारंवार सांगण्यात आले आहे. आम्ही यापूर्वीच असे दावे फेटाळले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्द्यावर तिसऱ्या पक्षाची कसलीही भूमिका नाही. दोन देशांच्या डीजीएमओमध्ये झालेल्या थेट चर्चेनंतर शस्त्रविरामावर एकमत झाले, ही आपली भूमिका यापूर्वीही अनेकदा स्पष्ट करण्यात आलेली आहे.

चीनचे पराराष्ट्रमंत्री वांग यी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाने चीनने मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षास अनेक जागतिक संघर्षामध्ये मध्यस्थी केल्याचा दावा केल्यानंतर यावर भारताकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान युद्धबंदीसाठी आम्ही मध्यस्थी केल्याचा दावा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी चीनच्या परराष्ट्र संबंधांवरील परिसंवादात बोलताना केला आहे. शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एक वस्तुनिष्ठ आणि तर्कसंगत दृष्टिकोन स्वीकारला आहे. संघर्षाचे प्रश्न सोडवण्यासाठी चीनच्या या दृष्टिकोनाचा अवलंब करून आम्ही उत्तर म्यानमार, इराणचा आण्विक प्रश्न, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव, यासारखे प्रश्न सोडवले. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील समस्या आणि कंबोडिया आणि थायलंडमधील संघर्षात मध्यस्थी केली, असा दावा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केला आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान युद्धबंदीसाठी तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला भारताने वारंवार नकार देत या संदर्भातील सर्वच दावे फेटाळून लावलेले आहेत.

Comments
Add Comment