मुंबई : एका उमेदवाराच्या हलगर्जीपणामुळे भाजपला मुंबईतील एका हक्काच्या प्रभागावर पाणी सोडावे लागले आहे. संबंधित उमेदवार निवडणूक कार्यालयात १५ मिनिटे उशिरा पोहोचल्याने त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे या प्रभागात भाजपची कोंडी झाली असून, आता अपक्ष उमेदवाराला पाठींबा द्यावा लागणार आहे.
भाजपने मंदाकिनी खामकर यांना वॉर्ड २१२ मधून उमेदवारी दिली होती आणि पक्षाकडून वेळेत एबी फॉर्मही प्रदान करण्यात आला होता. मात्र, निवडणूक अर्जासोबत जोडावे लागणारे नवीन बँक खात्याचे काम पूर्ण करण्यासाठी त्या बँकेत गेल्या. बँकेतील तांत्रिक प्रक्रिया आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. बँकेचे काम आटोपून त्या थेट प्रभाग कार्यालयात पोहोचल्या, पण तोपर्यंत मुदत संपली होती.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. मात्र, मंदाकिनी खामकर या प्रभाग कार्यालयात ५:१५ वाजता पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. या घटनेमुळे भाजपला निवडणुकीपूर्वीच एका महत्त्वाच्या जागेवर मोठा धक्का बसला आहे.






