श्रीरामपूर : पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. दुपारी सुमारे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली असून, शहरातील कॉलेज रोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागिरदारवर गोळीबार केला. या हल्ल्यात बंटी जहागिरदार गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.
बंटी जहागिरदार कॉलेज रोडने दुचाकीवरून जात असताना अचानक दोन अज्ञात इसमांनी जवळ येत त्याच्यावर गोळीबार केला. काही सेकंदातच हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अनेक दुकाने तातडीने बंद करण्यात आली. अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हे नाव २०१० साली पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात चर्चेत आले होते. या प्रकरणातील तो प्रमुख आरोपींपैकी एक होता. दीर्घ काळ तुरुंगवासानंतर त्याला २०२३ मध्ये जामीन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो श्रीरामपूर परिसरात राहत असल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला केवळ वैयक्तिक वादातून झाला की यामागे काही मोठा कट आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली. तसेच, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी काही समर्थक व नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत, शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त वाढविण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी विशेष पथके तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांनी कोणत्या दिशेने पलायन केले, तसेच हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा सखोल तपास सुरू आहे. वैयक्तिक वैर, जुना वाद की गुन्हेगारी पार्श्वभूमी यापैकी कोणता धागा पुढे येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.






