Wednesday, December 31, 2025

मीरा-भाईंदरमध्ये भाजप - शिवसेना स्वबळावर

मीरा-भाईंदरमध्ये भाजप - शिवसेना स्वबळावर

जोरदार शक्तिप्रदर्शन करत भरले नामांकन पत्र

भाजपचे ३ माजी महापौर रिंगणात; २४ वर्षीय युवतीला उमेदवारी

भाईंदर : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती होणार किंवा नाही या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला असून दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवीत आहेत. भाजपा आणि शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी आपली नामांकन पत्रे भरली आहेत.

भाजपाने २४ वर्षीय युवतीला उमेदवारी देऊन निवडून आणण्याचे आव्हान स्वीकारल्यामुळे ती सर्वात कमी वयाची नगरसेविका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युती बाबतच्या चर्चेला यश न आल्याने दोन्ही पक्षांनी मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आपल्या उमेदवारांची नामांकन पत्र भरली आहेत. उबाठाचे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी वर्षाभरापूर्वीच भाजपात प्रवेश करून मुलगी आकांक्षा विरकर हिला शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या प्रभाग क्र. १० मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी आकांक्षाला निवडून आणण्याचा चंग बांधल्यामुळे आकांक्षा विरकर सर्वात कमी वयाची नगरसेविका होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या ३ माजी महापौरांनी सुद्धा नामांकन पत्र भरली आहेत. तसेच उप महापौर हसमुख गहलोत यांनीसुद्धा पूर्वीच्याच प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही माजी नगरसेवकांच्या प्रभागात अदलाबदल करण्यात आली आहे. शहरातील ७ निवडणूक कार्यालयात सर्व पक्षीय उमेदवारांनी गर्दी केली होती. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), उबाठा, मनसे, रिपब्लिकन पार्टी, आम आदमी पार्टी, तसेच अनेक अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

मीरा भाईंदरमध्ये भाजप ८६ जागा लढविणार; राष्ट्रवादी (अजित पवार) ८ तर १ आरपीआय ९५ जागांपैकी भाजप ८६ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासाठी ८ तर आरपीआय साठी १ जागा सोडण्यात आली आहे. आ.मेहता मेहता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भाजपने जागा वाटपात सर्व प्रादेशिक उमेदवारांना संधी दिली आहे. ७० हून अधिक उमेदवार जिंकण्याचा विश्वास नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment