डोंबिवली: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची काल (३० डिसेंबर) शेवटची तारीख होती. काल दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. त्यानंतर कोण विरुद्ध कोण हे चित्र स्पष्ट होणार होते. मात्र अर्ज दाखल केल्यानंतर काही वेळातच कल्याण डोंबिवलीमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या भाजपच्या रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपच्या रेखा चौधरी प्रभाग क्रमांक १८(अ ) मधून नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे रेखा चौधरी बिन विरोध असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांच्या अर्जाची कोणत्याच प्रकारे छाननी झाली नाही आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या अर्जाची छाननी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे छाननीनंतर त्यांच्या विजयाची औपचारीक घोषणा होईल. मात्र बिनविरोध निवड झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खातं उघडले आहे.
केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक १८(अ) ही जागा मागास प्रवर्ग महिला वर्गासाठी राखीव होती. या प्रवर्गाच्या जागे करता भाजपने रेखा राजन चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात ठाकरे बंधू किंवा काँग्रेस आघाडीचा उमेदवार त्यांना अपेक्षित होता. पण अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या विरोधात कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.






