पुणे महानगरपालिकेत मोठमोठ्या राजकीय घडामोडी होताना दिसत असतानाच, कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहेत. गुंडाची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून प्रभाग १० बावधनमधून एबी फॉर्म देण्यात आला आहे. गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे आंदेकर कुटुंबाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर मंगळवारी एबी फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरांच्या घरात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवारांनी एका कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यातील कोयता गँग बंद झाली पाहिजे. अशी सूचना केली होती. आम्ही तुमच्यासाठी पोलिसांची संख्या वाढवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. आता गुंडाच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.






