Wednesday, December 31, 2025

११५ जागांसाठी ९४९ उमेदवारी अर्ज दाखल

११५ जागांसाठी  ९४९ उमेदवारी अर्ज दाखल

शेवटच्या दिवशी इच्छुकांची एकच गर्दी

विरार : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेल्या कालावधी पैकी सात दिवसात केवळ ५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर शेवटच्या दिवशी मात्र इच्छुक उमेदवारांची मोठी झुंबड उडाली होती. मंगळवारी एकाच दिवसात ८९० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, ११५ जागांसाठी एकूण ९४९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. बंडखोरीच्या भीतीने सर्वच राजकीय पक्षांनी अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नव्हती.

वसई - विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबर पासून सुरवात झाली होती. २९ डिसेंबर पर्यंत २९०० अर्जाची विक्री झाली होती. मात्र उमेदवारी अर्ज केवळ ५९ दाखल करण्यात आले होते. त्यामुळे अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालिकेच्या विविध प्रभाग समितीच्या कार्यालयात उमेदवारांची एकच गर्दी झाली होती. उबाठा गटाच्या उमेदवारांनी सोमवारीच अर्ज दाखल करण्यास सुरवात केली होती. मात्र उर्वरित अर्ज मंगळवारी दाखल करण्यात आले. दुसरीकडे बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, मनसे भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या उमेदवारांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले. दरम्यान,बविआ, काँग्रेस आणि मनसे सोबत आघाडी झाली नसल्याने शिवसेना उबाठा गटाने सर्वच ११५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मनसेच्या २ उमेवारांनी तर काँग्रेसच्या ८ तर बविआ च्या उमेदवारांनी सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासह भाजपच्या ८८ आणि शिवसेनेच्या २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

भाजपने एकमेव नगरसेवकाचे तिकीट कापले

२०१५ च्या निवडणुकीत भाजपतर्फे केवळ किरण भोईर हे एकच नगरसेवक निवडणूक आले होते. त्यामुळे यावेळी त्यांची उमेदवारी पक्की समजल्या जात होती. मात्र किरण भोईर यांना भाजपने तिकीट नाकारले आहे. उमेदवारी नाकारण्याबाबत कोणतेही उत्तर वरिष्ठांकडून मिळालेले नाही. त्यामुळे मी अपक्ष अर्ज दाखल केल्याचे भोईर यांनी सांगितले. तसेच भाजपमधून नाराज झालेल्या शेखर धुरी यांनी सुद्धा बविआमधून अर्ज दाखल केला आहे.

बविआचे दोन माजी महापौर पुन्हा रिंगणात

बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर प्रवीण शेट्टी, रुपेश जाधव , उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज यांच्यासह माजी नगरसेवक पुष्पा जाधव, कल्पेश मानकर, वृदेश पाटील, रमेश घोरकाना, कन्हैया भोईर, माया तळेकर, प्रमिला पाटील इत्यादी माजी नगरसेवकांना बहुजन विकास आघाडीने पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

स्वराज्य अभियान बविआच्या छायेत

माजी नगरसेवक तथा स्वराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष धनंजय गावडे यांनी या निवडणुकीत आपले कट्टर राजकीय विरोधक असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्याशी जुळवून घेतले आहे. स्वराज्य अभियानाचे धनंजय गावडे आणि प्रिन्स सिंग या दोघांनी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या कोलांटउड्या अद्यापही सुरूच आहेत. मात्र स्वराज्य अभियानाचे गावडे हे बहुजन विकास आघाडी सोबत हात मिळवणी करतील असा अंदाज बांधणे वसई-विरारमधील प्रत्येक राजकारणासाठी कठीण होते.

Comments
Add Comment