Wednesday, December 31, 2025

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज

मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावांचा हिमालयीन टप्पा गाठण्यापासून विराट आता अवघ्या २५ धावा दूर आहे. हा टप्पा ओलांडताच विराट कोहली अशा एका विशेष क्लबमध्ये सामील होईल, जिथे आतापर्यंत जगातील केवळ दोनच फलंदाजांना पोहोचता आले आहे. विराट कोहलीने जरी कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून संन्यास घेतला असला, तरी तो वनडे क्रिकेटमध्ये बॅटने चांगलीच फटकेबाजी करत आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने एकट्याने संघाची फलंदाजी सांभाळली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत ३ सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले होते. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकावीरचा पुरस्कारही मिळाला होता. विराट कोहलीने सिद्ध केले आहे की, जरी त्याने इतर फॉरमॅटमधून संन्यास घेतला असला, तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची बॅट अजूनही धावा ओकत आहे.

कोहलीचा विजयरथ सुरूच

२०२५ मध्येही विराटची बॅट धावा ओकत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून, आता सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा या २५ धावांकडे आणि एका ऐतिहासिक विश्वविक्रमाकडे लागल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ दोन फलंदाजांनी २८ हजार धावांचा टप्पा पार केला आहे

  • सचिन तेंडुलकर : ३४,३५७ धावा (भारत)
  • कुमार संगकारा : २८,०१६ धावा (श्रीलंका)

विराट कोहली सध्या २७,९७५ धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आगामी सामन्यात केवळ २५ धावा करताच तो हा ऐतिहासिक टप्पा गाठणारा जगातील तिसरा आणि भारतातील दुसरा फलंदाज ठरेल.

Comments
Add Comment