जागावाटपाची अधिकृत घोषणा नाही
कल्याण : उद्या (ता.३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. काहींना महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून एबी फार्म देण्यात आले आहेत; परंतु जागावाटपाची अधिकृत घोषणा करायला आजही मुहूर्त मिळालेला नाही यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. जागावाटपाचे गुपित उघड होत नसल्याने युतीमधील ताण तणाव वाढत चालला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मुंबई महापालिकेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेची ओळख आहे. दरम्यान काळात निवडणुकीची तारीख जाहीर होताच सभांना सुरुवात झाली. मेळावे आणि सभांमध्ये घोषणाबाजी आणि भाषणाना उधाण आले होते. नगरसेवक पदांसाठी इच्छुक असलेले हौशे-नौशे जागावाटपच्या अधिकृत घोषणेकडे डोळे लाऊन बसले आहेत. मंगळवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अजुनही अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही.
तर कल्याण पूर्वेत भाजपने ९ जागांसाठी आणि शिवसेना (शिंदे गट) १६ उमेदवारी जाहीर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर काही इच्छुकांना उमेदवारी अर्ज न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. असे असले तरी अजून कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीचे चित्र अस्पष्टच आहे. महायुतीने जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने एक समिती स्थापन केली होती. मात्र भाजप कडून ८३ जागांची मागणी करण्यात आली. भाजपच्या वाट्याला ५८ तर शिवसेना (शिंदे गट) ६४ जागांवर लढेल, असे ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारीची अधिकृत घोषणा होत नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम आहे.






