Tuesday, December 30, 2025

Stock Market Investors Returns: अंतर्बाह्य संकटांना तोंड दिल्यानंतरही गुंतवणूकदारांची यावर्षी ३० लाख कोटींची कमाई

Stock Market Investors Returns: अंतर्बाह्य संकटांना तोंड दिल्यानंतरही गुंतवणूकदारांची यावर्षी ३० लाख कोटींची कमाई

मोहित सोमण: मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूकदारांनी केलेली विक्री, युएससह टॅरिफबाबत असलेली अनिश्चितता, रूपयाचे अवमूल्यन, चलनवाढ अशा समस्यांना सामोरे जावे लागून सुद्धा या आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात ३० लाख कोटींची कमाई केली आहे. कारण बीएसई सेन्सेक्स ८% पेक्षा अधिक पातळीवर उसळला असून निफ्टी हा १०% उसळला आहे. त्यामुळे बाजारातील विक्री वगळता परतावा पाहिल्यास ३० लाख कोटींची अतिरिक्त कमाई गुंतवणूकदारांनी बाजारात केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतीत अधिक भाष्य करताना विश्लेषकांच्या मते, प्रतिकूल परिस्थिती असूनही, मजबूत देशांतर्गत गुंतवणूकदारांचा पाठिंबा कायम राहिलेला आहे तसेच स्थूल आर्थिक स्थिरतेमुळे (Stable Economic Growth) यामुळे शेअर बाजारांनी लवचिकता (Flexibility) दर्शविली आहे. ज्याची परिणती मजबूत जीडीपी वाढीच्या रूपात झाली.

याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना,' परदेशी गुंतवणूकदारांसाठी निधीचा बहिर्वाह ही एक समस्या असूनही, बाजाराची लवचिकता दिसून आली. २०२५ मध्ये भारतीय बाजारासाठी प्रमुख चालकांपैकी एक म्हणजे मजबूत देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याची उपस्थिती' असे इनक्रेड वेल्थचे सीईओ नितीन राव म्हणाले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, या वर्षी २९ डिसेंबरपर्यंत, सेन्सेक्स ३० (बीएसई सेन्सेक्स) हा ६५५६.५३ अंकांनी म्हणजेच ८.३९% वाढला. या बेंचमार्कने १ डिसेंबर रोजी ८६१५९.०२ या सेन्सेक्सने विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला होता. या वर्षी आतापर्यंत बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३०२०३७६.६८ कोटी रुपयांनी वाढून ४७२१५४८३.१२ कोटी रुपये (५.२५ ट्रिलियन डॉलर्स) झाले आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने प्रथमच ४०० लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक मोठा टप्पा गाठला होता. दरम्यान बाजारातील अस्थिरता पाहता भूराजकीय राजकीय, आर्थिक धक्क्याचा सामना बाजाराला करावा लागला. जगभरात सुरू असलेली युद्ध, तसेच चलनवाढ वाढलेले अतिरिक्त शुल्क, तसेच बाजारातील एकीकडे सुरू असणारी घरगुती गुंतवणूकदारांकडून होणारी वाढ व दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी वाढती विक्री यामध्ये तफावत आढळली होती. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात कंसोलिडेशन (एकत्रीकरण) झाल्याचे दिसून आले.याच संक्रमणाचा भाग म्हणून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून विक्रमी १.६ लाख कोटी रुपये (१८ अब्ज डॉलर्स) बाजारातून काढून घेतले होते ज्याचा फटका बाजारात बसला.

त्यामुळेच २०२५ हे वर्ष भारतीय इक्विटीसाठी विशेष एकत्रीकरणाचे आणि संक्रमणाचे (Bear Bull Transformation) वर्ष म्हणून सर्वोत्तम वर्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहे असे ऑनलाइन ट्रेडिंग आणि वेल्थ टेक फर्म एनरिच मनीचे सीईओ पोनमुडी आर प्रसारमाध्यमांना म्हणाले आहेत. 'अनेक वर्षांच्या मजबूत दुहेरी अंकी परताव्यांनंतर, बेंचमार्क निर्देशांकांनी अधिक मध्यम नफा मिळवून दिला, ज्यात सेन्सेक्स आणि निफ्टी या वर्षी सुमारे ८-१०% वाढले. जरी हा परतावा मागील वर्षांच्या तुलनेत माफक वाटत असला तरी, तो जागतिक प्रतिकूल परिस्थिती, परदेशी निधीची जावक (Outflow) आणि मूल्यांकनातील सुधारणांच्या पार्श्वभूमीवर मिळाला आहे' असे त्यांनी नमूद केले.

प्राथमिक बाजारात पाहिल्यास या वर्षी विक्रमी संख्येने आलेल्या प्रारंभिक सार्वजनिक बाजारातील विक्रीमुळे (IPO) नफा नोंदविण्यात गुंतवणूकदारांना मदत झालेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, या वर्षातील सर्वात मोठ्या मेन-बोर्ड आयपीओंमध्ये, टाटा कॅपिटलचा १५५१२ कोटी रुपयांचा इश्यू पहिल्या क्रमांकावर होता त्यानंतर एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस (१२५०० कोटी रुपये), एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया (११६०७ कोटी रुपये), हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज (८७५० कोटी रुपये), लेन्सकार्ट सोल्युशन्स (७२७८ कोटी रुपये) आणि बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स (६६३२ कोटी रुपये) यांचा कंपनीचा क्रमांक लागतो. रिलायन्स इंडस्ट्रीज ही बाजार भांडवल अथवा मूल्यांकनाच्या (Market Capitalisation) बाबतीत देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल २०९११७३ कोटी रुपये आहे त्यानंतर एचडीएफसी बँक (१५२५,४५७.७५ कोटी रुपये), भारती एअरटेल (११८६९७८.७५ कोटी रुपये), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (११७७१९९.०५ कोटी रुपये) आणि आयसीआयसीआय बँक (९६०४७८.३६ कोटी रुपये) यांचा पहिल्या पाचात समावेश आहे. या ब्लू चिप्स कंपन्या बाजारात प्रभावी ठरल्या आहेत.

गेल्या वर्षी सेन्सेक्समध्ये ५८९८.७५ अंकांची किंवा ८.१६ टक्क्यांची वाढ झाली होती. २०२४ मध्ये बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७७.६६ लाख कोटी रुपयांनी वाढून ४४१९५,१०६.४४ कोटी रुपये झाले होते. तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात ८१.९० लाख कोटी रुपयांची मोठी वाढ झाली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >