Tuesday, December 30, 2025

रायगडच्या राजकारणाला संघर्षाची किनार

रायगडच्या राजकारणाला संघर्षाची किनार

खोपोलीतील हत्याकांडाने जिल्ह्यातील जुन्या घटनांचे स्मरण

सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्याचे राजकारण नेहमीच निवडणुकीनंतर जिल्ह्यात होणाऱ्या राजकीय हाणामाऱ्या, खून आदींमुळे चर्चेत राहिलेले असून, राजकीय पार्श्वभूमी नेहमीच रक्तरंजितच राहिलेली आहे. खोपोलीत नगर परिषदेच्या निकालानंतर झालेल्या शिंदेगट शिवसेनेचा नेता मंगेश काळोखे या नेत्याच्या हत्येनंतर यापूर्वी घडलेल्या अनेक घटना डोळ्यांसमोरून तरळून गेल्या आहेत.

रायगड जिल्ह्याचे राजकारण सन १९८० च्या दशकापर्यंत शेकाप आणि काँग्रेस या दोन पक्षांभोवतीच फिरत राहिले होते. या काळात दोन्ही पक्षांमध्ये सर्वच निवडणुकांमध्ये तुंबळ हाणामाऱ्या झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यातूनच अनेकांचे खून होण्याबरोबरच काहीजण जखमीही झालेले आहेत. निवडणूक लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो अथवा जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या की, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामाऱ्या घडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सन १९८० च्या सुमारास तत्कालीन कर्जत-खालापूरचे काँग्रेसचे आमदार तुकाराम सुर्वे यांची अशीच राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती. चौक येथे मतमोजणीसाठी सुर्वे हे आपल्या वाहनातून निघाले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. ही हत्या राजकीय वैमनस्यातूनच झाल्याचा संशयही त्यावेळी व्यक्त केला गेला. सन १९८० च्या दशकानंतर रायगडच्या राजकारणात शिवसेना दाखल झाली आणि राजकीय वातावरणच बदलून गेले. त्यानंतर राजकारणातील पिढी बदलली गेली. बेरजेचे राजकारण सुरू झाले आणि सत्तेची चटक सर्वच राजकीय पक्षांना लागली. त्यातूनच आघाडी, युती जन्माला येऊ लागल्या. नेतेमंडळी सोयीनुसार राजकारण करुन आपले अस्तित्व टिकवू लागल्याने तळागाळातील कार्यकर्तेही वादावादी पुरे म्हणू लागली. त्यातूनही महाड, पोलादपूर, चौक, कर्जत, रोहा तालुक्यात अशाच राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये महाडमधील पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक चौधरींचीही हत्या झाली होती. या प्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यातून ते निर्दोषमुक्त झाल्याचे ऐकिवात आहे. रोहे तालुक्यातील वरवडे पाल येथील ग्रामपंचायत निवडणूक वादातून शेकाप-काँग्रेस यांच्यात तुंबळ हाणामारी होऊन एकाची हत्या झाल्याचेही ऐकिवात आहे. सन १९९५च्या सुमारास खालापूर तालुक्यातील चौक येथे पतिन पावन संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अरुण आयरे यांचीही अशीच राजकीय वैमनस्यातून हत्या झाली. या हत्याकांडप्रकरणी कर्जत-खालापूरचे तत्कालीन शिवसेना आमदार देवेंद्र साटम यांना अटकही झाली होती. खटलाही चालला. त्यातून ते निर्दोषमुक्तही झाले. हे प्रकरण त्या काळी खूपच गाजले होते. त्यावेळी साटम यांच्यावर कारवाईसाठी तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंवर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी मोठा दबावही टाकला होता. १९८० च्या दरम्यान रोहे तालुक्यातील भातसई येथेही ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकारणातून मोठे हत्याकांड घडले होते. शेकाप विरुद्ध काँग्रेस कार्यकर्ते अशी तुंबळ हाणामारीही झाली होती. जिल्हा न्यायालयात हा खटला प्रदीर्घ काळ चालला. त्यावेळी शेकापतर्फे तत्कालीन ज्येष्ठ वकील दत्ता पाटील, तर काँग्रेसतर्फे ॲड. दत्ता खानविलकर यांनी वाद, प्रतिवाद केले. विशेष म्हणजे या खटल्यात शंभरपेक्षा जास्त आरोपी करण्यात आले होते. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने या खटल्यातील सर्वांचीच निर्दोष मुक्तता केली होती. कर्जत नगरपालिका निवडणुकीतही सन २००४ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन पराभूत उमेदवार मोहन श्यामराव सोनावणे यांचीही अशीच राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली. या प्रकरणी तीन महिलांसह १५ जणांवर आरोपही ठेवण्यात आले. पण नंतर न्यायालयात सबळ पुराव्याअभावी त्यांची मुक्तता झाली.

दरम्यान, अशा घटनांनी अनेक कार्यकर्त्यांना नंतर पश्चाताप होण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबांनाही मन:स्ताप झाल्याचे ऐकिवात असतानाच खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालांनतर मंगेश कोळखे यांच्या निघृण हत्येनंतर खोपोलीसह रायगड जिल्हा पूर्णत: हादरून गेला आहे. या घटनेने कोळखे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असून, घरातील कमावता मुख्य आधारच गेला आहे. पोलिसांच्या तत्परतेने काही आरोपी हाती लागलेले असले, तरी त्यांना यथावकाश शिक्षा होईलच. मात्र राजकीय बळी गेलेल्या मंगेश कोळखे यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार कोण देणार असा सवाल उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment