लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी लोअर परळ तसेच कांदिवली येथील निवडणूक प्रशिक्षण केंद्रांना ३० डिसेंबर २०२५ प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, प्रशिक्षण सत्राला उपस्थित राहून संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ करिता गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग महानगरपालिका शाळा तसेच कांदिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यगृह येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण केंद्रांना मंगळवारी ३० डिसेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, प्रशिक्षण सत्राला उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) मधील बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट यांची जोडणी, मॉक पोल घेण्याची कार्यपद्धती तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनुसरावयाच्या सर्व प्रक्रिया याबाबत गगराणी यांनी सविस्तर माहिती घेतली.
या पाहणीदरम्यान विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, उप आयुक्त (परिमंडळ ७) संजय कु-हाडे, उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी दक्षिण विभाग) स्वप्नजा क्षीरसागर, सहायक आयुक्त (आर मध्य विभाग) प्रफुल तांबे यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकारी उपस्थित होते.