Tuesday, December 30, 2025

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. दिवसभराचे काम संपवून घराकडे जाणाऱ्या प्रवाशांवर इलेक्ट्रिक बस काळासारखी धावून आली. बस रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडले. या भीषण अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

रात्रीच्या वेळी भांडुप स्टेशन परिसरात मोठी गर्दी असते. प्रवाशांची लगबग सुरू असतानाच ही इलेक्ट्रिक बस रिव्हर्स (मागे) घेऊ लागली. मात्र, अचानक बसचा वेग अनियंत्रित झाला आणि बस थेट प्रवाशांच्या रांगेत शिरली. काही प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. ब्रेकचे कर्रर्र आवाज आणि लोकांच्या किंकाळ्यांनी परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात काही जण बसच्या चाकाखाली अक्षरशः चिरडले गेले, तर काहींनी जीव वाचवण्यासाठी वेळीच उड्या मारल्या. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले नागरिक हे सामान्य चाकरमानी होते.

मृतांची नावे

१. प्रणिता संदीप (३५ वर्षे) २. वर्षा सावंत (२५ वर्षे) ३. मानसी मेघश्याम गुरव (४९ वर्षे) ४. प्रशांत शिंदे (३५ वर्षे)

जखमींची नावं

१) प्रशांत लाड – वय ५१ – रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

२) नारायण भिकजी कांबळे – वय ४९ – रुग्णालयात उपचार सुरू

३) मंगेश मुकुंद दुखंडे – वय ४५ – उपचार सुरू

४) ज्योति विष्णु शिर्के – वय ५५

५) शीतल प्रकाश हडवे – वय ३९ – किरकोळ दुखापत, प्रकृती स्थिर

६) रामदार रुपे – वय ५९ – किरकोळ दुखापत, प्रकृती स्थिर

७) प्रताप कोरपे – वय ६० – उपचार सुरू

८) रविंद्र घाडिगांवकर – वय ५६ – रुग्णालयात उपचार सुरू

९) दिनेश सावंत – वय ४९ – उपचार सुरू , प्रकृती स्थिर

१०) पूर्वा – वय १२ – रुग्णालयात उपचार सुरू

दोषी चालकावर कठोर कारवाई; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अपघातानंतर पोलिसांनी बस चालक संतोष रमेश सावंत (५२ वर्षे) याला तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, ११०, १२५(अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाने मद्यप्राशन केले होते का? किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त

या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रति त्यांनी संवेदना प्रकट केल्या असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. जखमींना योग्य उपचार मिळतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Comments
Add Comment