नेत्यांना लागली बंडखोरीची चिंता

गेल्या पाच दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका युती-आघाड्यांच्या फेरबदल आणि बंडखोरींनी गाजल्या. कोल्हापुरात महायुतीच्या फॉर्म्युल्याने स्थिरता येईल, इचलकरंजीत नव्या आघाडीमुळे स्पर्धा वाढेल, तर सांगलीत भाजपची एकजूट विरुद्ध दोन राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले, तर भाजपला मोठा धक्का पोहोचू शकतो. 


वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्र


दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार, पाच दिवसांत राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचे तिढे, उमेदवारी याद्यांतील बदल, बंडखोरीची शक्यता आणि नव्या आघाड्यांच्या घोषणा यांनी निवडणुकीचे वातावरण अधिक तापले आहे. नेत्यांना बंडखोरीची चिंता असून कोणतेही आश्वासन देऊन एखाद्याला थांबवले तरी तो वचपा काढेल काय याची चिंता आहे. नामनिर्देशन प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याची गर्दी वाढली असून, आज शेवटची मुदत आहे. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या तीन महापालिकांच्या निकालाकडे दक्षिण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


कोल्हापूर : महायुतीचा फॉर्म्युला आणि प्रयोग


कोल्हापूर महापालिकेत महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, अंतिम फॉर्म्युला ठरला आहे. ८१ जागांपैकी ७९ जागांवर एकमत झाले असून, भाजपला ३५, शिवसेनेला ३१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळणार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाला सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर आणि चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित दोन जागांवर ११ वाजेपर्यंत निर्णय अपेक्षित आहे.


काँग्रेसचा कडक इशारा


काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना कडक इशारा दिला आहे. चार सदस्यांच्या पॅनेलमध्ये एकटाच उमेदवार निवडून आल्यास आणि इतर तिघे पराभूत झाल्यास, विजयी नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेतला जाईल. काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली असून, ४८ उमेदवारांमध्ये २९ नवे चेहरे आहेत. शिवसेना (ठाकरे गट)ला सात जागांवर समाधान मानावे लागेल, तर दुसरी यादी सोमवारी रात्री जाहीर झालेली असेल. हे बदल महाविकास आघाडीची एकजूट दाखवतात, परंतु महायुतीच्या अंतिम घोषणेनंतर स्पर्धा अधिक तीव्र होईल.


इचलकरंजी : आघाड्यांमध्ये फूट, बंडखोरी


इचलकरंजी महापालिकेत प्रथमच होत असलेल्या निवडणुकीत राजकीय घडामोडी वेगवान आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने महायुतीत पुन्हा प्रवेश केला असून, त्यांना दोन जागा मिळणार आहेत. यामुळे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मार्ग मोकळा झाला. सुरुवातीला भाजप-शिवसेना युतीसाठी ५४ आणि ११ जागांचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र, महाविकास आघाडीला धक्का बसला; शिवसेना (उबाठा गट)ला केवळ दोन जागा मिळाल्याने त्यांनी स्वबळावर २५ ते ३० जागा लढवण्याचा निर्णय घेतला. शिव-शाहू आघाडीला मोठा धक्का बसला असून, जागावाटपावर एकमत न झाल्याने आम आदमी पार्टी (आप) आणि स्वाभिमानी पक्ष बाहेर पडले. या दोन्ही पक्षांनी वंचित बहुजन आघाडीसोबत 'इचलकरंजी परिवर्तन आघाडी' स्थापन केली असून, ते सर्व ६५ जागालढवणार आहेत.


आर्थिक निकषावर उमेदवारी


आर्थिक निकषावर उमेदवारी निश्चित होत असल्याचा आरोप करून हेमंत वणकुंद्रे आणि जनार्दन गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव सेना आणि मनसेही आज बैठक घेऊन भूमिका जाहीर करतील. भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलल्याने बंडखोरी सुरू झाली असून, नाराज इच्छुक विरोधी पक्षांसोबत चर्चा करत आहेत.


९० टक्के नावे ठरवूनही स्थगिती


यादी जाहीर झाल्याने मुख्यमंत्र्यांनी संभाव्य यादीला स्थगिती दिली असून, दोन दिवसांत नवीन नावे निश्चित होणार आहेत. आवाडे आणि हाळवणकर गटांच्या बैठकीत ९० टक्के नावे ठरली होती, परंतु वादांमुळे मुंबईत उच्चस्तरीय बैठक झाली. माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन यांनी शिव-शाहू आघाडीत प्रवेश केला. अर्ज विक्रीत विक्रम नोंदला गेला असून, शेवटच्या दिवसापर्यंत अर्जांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पक्षांच्या याद्या प्रलंबित असल्याने उमेदवारी दाखल करण्यास विलंब होत आहे.


सांगली : भाजपमध्ये कलह, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र


सांगली महापालिकेत भाजपमधील अंतर्गत कलह टोकाला गेला आहे. आमदार गाडगीळ, खाडे या दोघांसह पालकमंत्री समर्थक निवडणूक प्रमुख शेखर इनामदार असा सत्तारूढ गटाचा वाद टोकाचा झाला आहे. त्यात काँग्रेसमधून आलेल्या जयश्री मदन पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांना जागा सोडताना हा वाद टोकाला गेला. रविवारी रात्री हा वाद सुटला असल्याचे सांगितले जात आहे. अनेक प्रभागात त्यांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, यादी अधिकृतपणे जाहीर झालेली नाही; परंतु प्रभाग १५ वगळता अन्य प्रभागांतील नावे स्पष्ट झाली आहेत. आरपीआय (आठवले गट) ला एक जागा आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला ४ जागा मिळाल्या आहेत. महायुती तुटली असून, शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर लढेल, कारण जागावाटपात यश आले नाही. राष्ट्रवादीनेही स्वबळाचा निर्णय घेतला. उमेदवारी यादी २९ डिसेंबरला रात्री जाहीर होईल, तर एबी फॉर्म ३० डिसेंबरला देण्यात येतील.


दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?


काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) अजित पवार या प्रमुख पक्षांनी भाजपातील नाराजांना लक्ष्य केले आहे.निवडणुकीसाठी ७८ जागांसाठी १९८५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी १७ आणि पहिल्या दिवशी ८ अर्ज दाखल झाले. सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत गर्दी असून, प्रशासनाने पारदर्शक प्रक्रियेसाठी सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त आणि मदत कक्षाची व्यवस्था केली आहे. आयुक्त सत्यम गांधी यांनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर कडक कारवाईचा इशारा दिला असून, निवडणूक पारदर्शक आणि अचूक होण्यासाठी मनोबल वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.


गेल्या पाच दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका युती-आघाड्यांच्या फेरबदल आणि बंडखोरींनी गाजल्या. कोल्हापुरात महायुतीच्या फॉर्म्युल्याने स्थिरता येईल, इचलकरंजीत नव्या आघाडीमुळे स्पर्धा वाढेल, तर सांगलीत भाजपची एकजूट विरुद्ध दोन राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले तर भाजपला मोठा धक्का पोहोचू शकतो. यामध्ये आपलाही नंबर लागावा यासाठी अर्ज विक्रीचा विक्रमी उत्साह आहे. मतदारांना पारदर्शक निवडणुकीची अपेक्षा असून, आचारसंहितेचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. पुढील दिवसांत उमेदवारी याद्या जाहीर होऊन प्रचाराला वेग येईल. मात्र तूर्तास नेत्यांना चिंता लागली आहे ती बंडाळीची. थोड्या थोडक्या मतांनी नगरपालिका निवडणुकीत झालेले बदल लक्षात घेऊन महापालिकेत ते जपून पाऊल टाकत आहेत. मात्र तरीसुद्धा सर्वांना आनंदी ठेवणे कोणालाही शक्य होणार नाही हे स्पष्ट आहे. विशेषतः भाजपमधील बंडखोरी टाळणे आता अशक्य दिसत आहे. त्यातही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून इतर काही पदांची आणि शासकीय समित्यांची आश्वासने देऊन मंडळी कमी करण्याचा प्रयत्न होईल मात्र निकाल होईपर्यंत बंडखोरांच्या कारणाम यांनी नेत्यांची चिंता मात्र कमी होणार नाही हे निश्चित.
- प्रतिनिधी


Comments
Add Comment

कोकणात राणे काल, आज आणि उद्याही

संतोष वायंगणकर नारायण राणे हे वटवृक्ष आहेत. त्यांच्यावरचा विश्वास आणि प्रेमाची पाळे-मुळे कोकणात खोलवर रूजली

खासगीकरणासोबत अंकुशही महत्त्वाचा

अल्पेश म्हात्रे इंडिगोने शेकडो उड्डाणे रद्द करून हजारो प्रवासी विमानतळांवर अडकवले, त्यांच्या प्रवास योजनांचा

विदर्भातले बोधप्रद निवडणूक निकाल

अविनाश पाठक आठवड्याच्या सुरुवातीलाच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीने विदर्भातील

भूतकाळातून बोध, भविष्याकडे वाटचाल

रवींद्र तांबे नववर्ष म्हणजे केवळ कॅलेंडरवरील तारीख बदलण्याचा क्षण नव्हे, तर आत्मपरीक्षणाचा, संकल्पांचा आणि

भारत-न्यूझीलंड करार: शेतीपासून कारखान्यांपर्यंत रोजगार

पीयूष गोयल (लेखक केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत. ) न्यूझीलंड भारताच्या १००% निर्यातींना शून्य शुल्काचा

मराठवाड्यातील महापालिका कोणाच्या?

डॉ. अभयकुमार दांडगे, abhaydandage@gmail.com महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून