Thursday, January 22, 2026

३७ प्रकल्पांना पावणेदोन कोटींचा दंड

३७ प्रकल्पांना पावणेदोन कोटींचा दंड

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई!

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आणि प्रदूषणविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) विशेष मोहीम हाती घेतली आहे.

शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांची अचानक तपासणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ प्रकल्पांकडून १.८७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर चार प्रकल्पांवर टाळे ठोकण्यात आले. एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईतील वायू प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच विशेष बैठक पार पडली. यावेळी, मुंबईसाठी चार आणि नवी मुंबईसाठी दोन विशेष तपास पथके तातडीने कार्यान्वित करण्याचे ठरवण्यात आले.

मोबाईल व्हॅनद्वारे पाहणी

मुंबई महानगर क्षेत्रात हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी एकूण ३२ केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी १४ केंद्रे मुंबई शहरात आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता ढासळते, तिथे तत्काळ मोजमाप करण्यासाठी २२ मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment