Tuesday, December 30, 2025

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड विंड' राबवणार आहे. या अंतर्गत घुसखोरांना दिसताक्षणी ठार केले जाईल. थंडीच्या दिवसांत जम्मू काश्मीरच्या सीमेवर अनेक ठिकाणी दाट धुके असते. या धुक्याचा गैरफायदा घेत अतिरेकी घुसखोरी करतात. या घुसखोरीला आळा घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल कठोर मोहीम राबवणार आहे. 

सीमा सुरक्षा दल ३१ जानेवारी २०२६ पर्यंत 'ऑपरेशन सर्द हवा' आणि 'ऑपरेशन कोल्ड विंड' राबवणार आहे. आवश्यकता भासल्यास या कारवाईला मुदतवाढ दिली जाईल. अतिरेकी अनेकदा प्रजासत्ताक दिनाच्या सुमारास सक्रीय होतात. यामुळे जानेवारी महिन्यात सीमा सुरक्षा दल जास्त खबरदारी घेणार आहे. सीमेवरील सुरक्षा मजबूत करणे आणि घुसखोरीला आळा घालणे याच उद्देशाने सीमा सुरक्षा दल ऑपरेशन राबवणार आहे.

सीमा सुरक्षा दलाने आता सीमेवर गस्त वाढवली आहे. अनेक ठिकाणी पायी तसेच वाहनांद्वारे अशी दोन्ही प्रकारे गस्त होते. ठिकठिकाणी उंचावर तसेच मोक्याच्या ठिकाणी चौकी पहारे बसवण्यात आले आहेत. सीमेवर तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. अनेक ठिकाणी आधुनिक रडार आणि सेन्सर यांच्या मदतीने सीमेवर पहारा ठेवला जात आहे. यामुळे घुसखोरीला आळा घालण्यास मदत होत आहे. आता ऑपरेशन राबवून घुसखोरी करणाऱ्यांचा पुरता बीमोड करण्याचा निर्णय सीमा सुरक्षा दलाने घेतला आहे. सीमेवर ठिकठिकाणी ड्रोन-आधारित देखरेख देखील वाढविण्यात आली आहे. विशेष ड्रोन कमांडो आणि ड्रोन योद्धे तसेच बीएसएफच्या दुर्गा वाहिनी युनिट्स देखील तैनात केल्या जातील. गुप्तचरांशी समन्वय ठेवला जाईल. आवश्यकता भासल्यास कमांडो पथकांची मदत घेतली जाणार आहे.

Comments
Add Comment