‘दैनिक प्रहार’ पुरस्कृत पास्थळ महोत्सव २०२५
पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि 'दैनिक प्रहार' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदिवसीय कला-क्रीडा महोत्सवाचा सांगता समारंभ २८ डिसेंबर रोजी (रविवारी) अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. पास्थळच्या आंबटगोड मैदानावर संपन्न झालेल्या या सोहळ्यात सांस्कृतिक वारसा आणि खेळाची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळाली. या महोत्सवात 'दैनिक प्रहार' पुरस्कृत स्पर्धांनी उपस्थितांची मने जिंकली असून बोईसर आणि परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला अभूतपूर्व गर्दी केली होती.
लोकधारा स्पर्धेत 'मी कलाकार मनोर' ग्रुपने मारली बाजी
महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 'भव्य महाराष्ट्र लोकधारा' (फोक डान्स) स्पर्धेने उपस्थितांना खिळवून ठेवले. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या स्पर्धेत एकूण १० नामांकित नृत्य गटांनी सहभाग नोंदवला होता. ढोल-ताशांच्या गजर आणि पारंपारिक वेशभूषेतील तरुणाईने सादर केलेल्या नृत्याविष्काराने मैदानावर चैतन्याचा संचार केला. या चुरशीच्या लढतीत 'ग्रुप ९ 'मी कलाकार', मनोर या संघाने आपल्या बहारदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकत ७,५०० रुपये आणि आकर्षक ट्रॉफीसह प्रथम क्रमांकावर आपली मोहोर उमटवली. त्यापाठोपाठ 'ग्रुप ३ 'पॉम्स सी', सातपाटी या संघाने द्वितीय (५,००० रुपये व ट्रॉफी) तर 'संस्कृती स्कूल', बोईसर च्या संघाने तृतीय (३,००० रुपये व ट्रॉफी) क्रमांक पटकावून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.
'दैनिक प्रहार'तर्फे कृतज्ञता
"बोईसर आणि परिसरातील नागरिकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महिला भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी 'दैनिक प्रहार'ने या महोत्सवात दोन भव्य स्पर्धांचे आयोजन केले होते. या दोन्ही स्पर्धांना बोईसरकरांनी जो भरभरून आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही अत्यंत ऋणी आहोत. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या 'जाणता राजा फाऊंडेशन'चे आणि उत्साही बोईसरकरांचे 'दैनिक प्रहार' परिवारातर्फे मन:पूर्वक आभार!"
‘खेळ पैठणीचा’मध्ये अर्चना पाटील ठरल्या मानकरी
- महोत्सवाचा विशेष आकर्षण असलेल्या 'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाने महिला भगिनींच्या उत्साहाला उधाण आणले होते. केवळ खेळच नव्हे, तर बुद्धिमत्ता आणि चपळतेचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेत बोईसर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. अतिशय अटीतटीच्या आणि मनोरंजक फेऱ्यांनंतर या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये महिलांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील अशा आकर्षक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. साखळी फेऱ्यांमधील चुरशीच्या खेळानंतर अर्चना पाटील या महोत्सवाच्या मानकरी ठरल्या असून त्यांनी प्रथम क्रमांकाची मानाची 'पैठणी साडी' पटकावली. द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या वंदना शेलार यांना गृहोपयोगी असा आकर्षक 'डिनर सेट' देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांकावर बाजी मारणाऱ्या कल्याणी दरांदरे यांना 'फ्राय पॅन' बक्षीस म्हणून देण्यात आला. तसेच, स्नेहल कुकरे यांनी चौथा क्रमांक पटकावत एक 'स्टायलिश पर्स' आपल्या नावे केली, तर पाचव्या क्रमांकाच्या विजेत्या सुषमा पाटील यांना शुभशकुन मानला जाणारा 'सुवर्णदीप' प्रदान करण्यात आला.
- या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन आयोजक उमेश घरत आणि हेमश्री उमेश घरत यांच्या मार्गदर्शनाखाली 'जाणता राजा फाऊंडेशन'च्या संपूर्ण टीमने केले होते. सचिव हितेश राऊत, खजिनदार निपुल घरत, सहसचिव जितेश घरत आणि सह-खजिनदार सौरभ घरत यांच्यासह फाऊंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध नियोजन केल्यामुळे या महोत्सवाची परिसरात मोठी चर्चा होत आहे. "पास्थळ आणि बोईसर परिसरातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हाच आमचा उद्देश होता आणि नागरिकांच्या प्रतिसादाने तो यशस्वी झाला," अशी भावना आयोजक उमेश घरत यांनी व्यक्त केली.






