गणेश पाटील विरार : महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीसाठी केलेला खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांना पिण्यासाठी दिलेल्या पाण्यापासून तर प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या गाड्यांपर्यंत झालेल्या सर्व खर्चाचा हिशोब उमेदवारांना सादर करावा लागणार आहे. वसई-विरारमध्ये शिट्टी हे बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाचे चिन्ह आहे. सर्वच निवडणुकीत प्रचारासाठी या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात शिट्ट्या खरेदी केल्या जातात. त्यामुळे वसई-विरारमध्ये उमेदवारांसाठी खर्चाच्या दिलेल्या दर सूचित शिट्टीचे दर सुद्धा ठरवून दिले आहेत.
परिणामी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या शिट्ट्याचा हिशोब त्यांना आता आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. महापालिकेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. तसेच निवडणूक काळात नियमितपणे आयोगाने दिलेल्या साईटवर दररोज झालेला खर्च देखील टाकावा लागणार आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना ३० दिवसाच्या आत झालेल्या जमा खर्चाचा हिशोब संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ११ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा आखून देण्यात आली आहे. दरम्यान, वसई-विरार निवडणुकीसाठी उमेदवारांकडून खर्च होणाऱ्या विविध वस्तू, साहित्य, खाद्यपदार्थ, आदींचे दरपत्रक महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी ठरवून दिले आहेत.
पाणी बॉटल, पाणी जार, चहा, कॉफी, व्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी, साधी जेवण थाळी, चिकन, मटण, मच्छी थाळी, यासह प्रचार कार्यालय भाडे, जाहीर सभेसाठी मैदान भाडे, लाईट, फॅन, संगणक, हार, गुलाल, मंडप, खुर्च्या, टोपी बिल्ले, मफलर अशा शेकडो वस्तू ज्या निवडणूक काळात उमेदवार वापरतात किंवा कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी खर्च करतात अशा सर्वांचे दर ठरवून देण्यात आलेले आहेत. याच वस्तूंमध्ये शिट्टीचा सुद्धा समावेश आहे. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी सर्वच निवडणुका शिट्टी या चिन्हावर लढते. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी सुद्धा त्यांनी शिट्टी हे चिन्ह आयोगाकडे नोंदणीकृत करून ठेवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून प्रचारादरम्यान शिट्टीचा वापर होणार आहे. मात्र यावेळी उमेदवारांना शिट्ट्या खरेदी केल्याचा हिशोब सादर करावा लागणार आहे.






