फळबाग नोंदणी व दर्जा तपासणी अनिवार्य
वाडा : भारतीय गहू, तांदूळ, फळे, भाजीपाला तसेच इतर कृषी उत्पादनांना परदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. या विदेशी व्यापारातून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत असून कृषी क्षेत्राला आर्थिक बळकटी मिळत आहे. मात्र निर्यात होणाऱ्या कृषी मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय निकषांनुसार उत्तम राहावा, यासाठी फळबागांची अगोदर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वर्षभरात भारतातून सुमारे ३ कोटी ३२ लाख टन कृषी मालाची निर्यात झाली असून, त्यातून २ लाख १७ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असून राज्यातील फळे व भाजीपाल्याला परदेशी बाजारपेठेत विशेष मागणी आहे.
निर्यातीसाठी शासनाचे प्रोत्साहन
कृषी मालाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी शासनाने विविध योजना राबवल्या आहेत. निर्यातीसाठी आवश्यक शीतगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, राज्यात जवळपास ४४ ठिकाणी निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत आहेत. याठिकाणी निर्यातीसाठी योग्य भाजीपाला व फळांचे उत्पादन कसे घ्यावे, त्यांचे पॅकिंग, साठवणूक व वाहतूक याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. फळबागांची नोंदणी आवश्यक निर्यातीसाठी अपेडा अंतर्गत मॅंगोनेट व द्राक्षनेट प्रणालीमध्ये फळबागांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया व आवश्यक तपशील उपलब्ध करून देण्यात आला असून, नोंदणीकृत बागांमधील फळांची विविध देशांमध्ये निर्यात करता येते.
दर्जा तपासणी व अहवाल
निर्यात होणाऱ्या फळे व भाजीपाल्याची दर्जा तपासणी केली जाते. शेतकरी व बागनिहाय तपासणी अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जातो. हा अहवाल अपेडाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी बागेचा नोंदणी क्रमांक व प्रपत्र चार-ब चा क्रमांक भरावा लागतो. त्यानंतरच कृषी माल निर्यातीस पात्र ठरतो, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
बागांची प्रत्यक्ष तपासणी
नोंदणी झाल्यानंतर कृषी अधिकारी प्रत्यक्ष बागांना भेट देऊन बागेची स्थिती, पीक व्यवस्थापन तसेच वापरली जाणारी खते व औषधे यांची पाहणी करतात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पीक घेतले जात असल्याची खात्री झाल्यानंतरच निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले जाते.
कुठे व कशाची निर्यात
आखाती देशांसह युरोप, अमेरिका तसेच आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये भारतातून कृषी मालाची निर्यात होते. महाराष्ट्रातून कांदा, आंबा, द्राक्षे, कलिंगड, संत्री, मोसंबी तसेच विविध भाज्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असून कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळत आहे.






