Thursday, January 29, 2026

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला बसल्याने उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या बदलत्या हवामानाचे पडसाद आता महाराष्ट्रात, प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उमटणार असल्याचा अंदाज आहे.

गेल्या २४ तासांत जम्मू, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात दृश्यमानता ५० मीटरपेक्षाही कमी नोंदवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबरपासून हिमालयामध्ये एक नवीन 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' सक्रिय होत आहे. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढणार असून, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उत्तर भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र या शीतलहरीच्या कक्षेत नसला, तरी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या लगतच्या राज्यांमध्ये होणाऱ्या तापमानातील घसरणीमुळे महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे. विशेषत: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रतील नागपूर, गोंदिया आणि नाशिकसारख्या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट होऊन हुडहुडी वाढणार आहे. सध्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस तापमानाचा पारा २ ते ४ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रालाही तापमानामध्ये होणाऱ्या या मोठ्या बदलाचा फटका बसू शकतो. ज्यात विमान आणि रेल्वे प्रवासाचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी जे पर्यटक उत्तर भारतात किंवा महाराष्ट्रातील उत्तर पट्ट्यात जाणार आहेत, त्यांनी थंडीमध्ये आवश्यक वस्तू घेऊनच बाहेर पडावे. तसेच धुक्यामुळे प्रवासी वाहनावर काय परिणाम होत आहे का? याची माहिती घ्यावी.

राज्यात पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळणार आहे. मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी थंडीचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात दाट धुके आणि गारठ्याने होणार असल्याचे म्हणावे लागेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >