Monday, December 29, 2025

नव्या वर्षासाठी रेल्वे प्रशासनाचे सज्ज! मुंबईच्या सेवेत येणार अतिरिक्त उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्या

नव्या वर्षासाठी रेल्वे प्रशासनाचे सज्ज! मुंबईच्या सेवेत येणार अतिरिक्त उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्या

मुंबई: नव्या वर्षाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रेल्वेकडून नागरिकांना नवा वर्षीची भेट मिळाली आहे. मुंबईतील सर्व चालू प्रकल्पांचे प्रत्यक्ष मूल्यांकन केल्यानंतर, रेल्वेने नवीन वर्षात ७०० अतिरिक्त उपनगरीय सेवा आणि मुंबईसाठी एक्सप्रेस गाड्या दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. हे मूल्यांकन ४८ प्रमुख शहरांसाठीच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. ज्यामध्ये कालबद्ध पद्धतीने रेल्वे क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजित, प्रस्तावित किंवा आधीच मंजूर केलेली कामे समाविष्ट आहेत. रेल्वे सेवा विस्तारासाठी मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूरची निवड केली आहे. तर, पश्चिम रेल्वेने मुंबई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, उज्जैन आणि इंदूर या सहा प्रमुख शहरांची निवड केली आहे.

मध्य रेल्वेवर पनवेल-कळंबोली टर्मिनस, लोकमान्य टर्मिनस-२, कल्याण आणि मेगा परळ-टिळक टर्मिनस मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे २२ फलाट आणि ३६ मार्गिका उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय कल्याण यार्डातील कामं, १५ डब्यांसाठी प्लॅटफॉर्म विस्तार, कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत तिसरी-चौथी मार्गिका, पनवेल फलाट क्रमांक चारची पुनर्बांघणी पूर्ण करणे, यानंतर ५८४ नव्या लोकल फेऱ्या सुरू करणार असल्याची माहिती आहे. तर २०२६ या वर्षात पश्चिम मार्गावर तीन फलाटांचे जोगेश्वरी टर्मिनस सुरू होणार आहे. यामुळे दादर, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये अतिरिक्त मार्गिकांची भर पडणार आहे. परिणामी लोकल आणि मेल-एक्सप्रेस वाहतूक स्वतंत्र होऊन १६५ नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्याची तयारी आहे. महत्त्वाचे म्हणजे गोरेगाव-बोरीवली हार्बर मार्गिका कार्यान्वित होणार आहे. याशिवाय वांद्रे-अंधेरी दरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

२०३० पर्यंत रेल्वेची मूळ क्षमता दुप्पट करण्याच्या कामांमध्ये सध्याच्या टर्मिनल्सना अतिरिक्त प्लॅटफॉर्मसह अपग्रेड करणे, स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स आणि पुरेशा शंटिंग या प्राथमिक सुविधा देण्यात येणार आहेत. वाहतूक सुविधा कामांसह विभागीय क्षमता वाढवणे, सिग्नलिंग अपग्रेड्स आणि विविध ठिकाणी वाढलेल्या गाड्या हाताळण्यासाठी आवश्यक असलेले मल्टीट्रॅकिंग यांचा समावेश असेल.

"वाढत्या प्रवाशांच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी आम्ही प्रमुख शहरांमध्ये कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करत आहोत. यामुळे रेल्वे नेटवर्क अपग्रेड होईल आणि देशव्यापी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल," असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

Comments
Add Comment