न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे. दुखापतीतून सावरलेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने त्याला तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र दिले असून, देशांतर्गत क्रिकेटमधून तो स्पर्धात्मक पुनरागमन करणार आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झेल घेताना श्रेयसला स्प्लीनची गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला दोन महिने खेळापासून दूर राहावे लागले. दरम्यान श्रेयस त्यांची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी प्रथम विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणार आहे. त्याचप्रमाने ३ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राविरुद्ध आणि ६ जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशविरुद्ध तो मैदानात उतरेल. त्याची खेळी पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल.
संघाला बळ
एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या दुखापतीमुळे भारतीय मधल्या फळीत निर्माण झालेली पोकळी आता भरून निघणार आहे. २०२७ च्या विश्वचषकाच्या दृष्टीने श्रेयसचे पुनरागमन संघासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
आंतरराष्ट्रीय पुनरागमन :
देशांतर्गत सामन्यांमध्ये कोणतीही अडचण न आल्यास, तो थेट भारतीय संघात सामील होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड निश्चित मानली जात आहे, जी ११ जानेवारीपासून वडोदरा येथे सुरू होत आहे.






