Monday, December 29, 2025

जिल्ह्यात दहा नगर परिषदांमध्ये धक्कादायक निकाल

जिल्ह्यात दहा नगर परिषदांमध्ये धक्कादायक निकाल

प्रस्थापितांना मोठा दणका

सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांचा कार्यकाळ संपल्यावर नगर परिषदांवरील प्रशासकीय राजवट, त्याच दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप या राजकीय पक्षांचे झालेले विभाजनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकीत जिल्ह्यात धक्कादायक निकाल लागल्याने प्रस्थापितांना मोठा दणका बसला आहे. सर्वात मोठा फटका भाजपला बसला. मागीलवेळी भाजपचे तीन नगराध्यक्ष होते. यावेळी केवळ एकमेव नगरपालिका भाजपच्या ताब्यात राहिली आहे. दुसरीकडे शिवसेना फुटीनंतर शिवसेना (ठाकरे) गटाने श्रीवर्धन नगरपालिका जिंकत सर्वांनाच धक्का दिला आहे.

रायगड जिल्ह्यातील दहांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेनेला प्रत्येकी तीन, तर शेकाप, ठाकरे सेना, भाजप, शरद पवार राष्ट्रवादीला प्रत्येकी एक नगराध्यक्षपद मिळाले आहे. रायगडमधील या दहा नगर परिषदांचा राजकीय पक्षनिहाय विचार करता, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मुरुड, रोहा आणि कर्जत, तर शिवसेना (शिंदे) पक्षाला खोपोली, माथेरान व महाड अशा प्रत्येकी तीन नगर परिषदा काबीज करता आल्या आहेत. शेकापने अलिबाग, भाजपने पेण, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उरण नगर परिषदेत यश मिळविले आहे. या निकालामुळे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांना धक्का बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असलेल्या अलिबाग नगर परिषदेत आपल्या ताब्यात राखण्यासाठी शेकापक्षासाठी ही निवडणूक केवळ प्रतिष्ठेची नव्हे, तर अस्तित्व सिद्धतेची निवडणूक होती. शेकापक्षाचे माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती डॉ. चित्रा पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लालसलाम करुन भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी अलिबाग नगरपरिषद निवडणुकीची सर्व सूत्रे अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडे सोपवली होती. त्यातच पारंपरिक राजकीय विरोधक राहिलेले शेकाप आणि काँग्रेस यावेळी एकत्र आले होते. याशिवाय त्यांना मनसेने देखील पाठिंबा दिल्याने या निवडणुकीचे समिकरणच बदलले गेले होते. अखेर शेकाप-काँग्रेस-मनसे युतीने या निवडणुकीत बाजी मारली.

श्रीवर्धन नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती असतानाही नगराध्यक्षपदी उबाठाचे अतूल चौगुले हे २१९ मतांच्या फरकाने निवडून आल्याने येथील परिस्थिती ‘गड आला पण सिंह गेला’ अशी परिस्थिती युतीची झाली. या नगरपालिकेत राष्ट्रवादीचे १५, भाजपचे दोन शिवसेना शिंदे गटाचे ३ उमेदवार निवडून आले. तशीच परिस्थिती महाड नगरपालिकेत राष्ट्रवादीची झाली. तेथेही राष्ट्रवादीची स्थिती ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच झाली आहे. तेथे शिंदेगट शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुनील कविस्कर निवडून आला. तेथे राष्ट्रवादीच्या वाट्याला दहा, भाजपला दोन, तर शिंदे शिवसेना गटाला ८ आठ जागा आल्या. रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढत चांगली कामगिरी करीत बाजी मारल्याने तेथील राष्ट्रवादीच्या गोटात आनंद आहे. मुरुडमध्ये शिंदेगट शिवसेना आणि काँग्रेसची युती, तर राष्ट्रवादी आणि उबाठा यांचीही युती झाली होती. दोन युत्यांमध्ये सरळ लढत झाली. त्यामध्ये २१ जागांपैकी १२ जागा युतीने, तर राष्ट्रवादी आणि उबाठा युतीने प्रत्येकी आठ जागा मिळविल्या. मात्र येथेही ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती शिवसेना व काँग्रेस युतीची पहायला मिळाली. मुरुडमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आराधना दांडेकर या निवडून आल्या. उरणमध्ये `गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती भाजपाची झाली. भाजपाला येथे २१ पैकी १२, तर महाविकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या. उरणमध्ये महाविकास आघाडीने जोर लावल्याने महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या निवडून आल्याने भाजप आमदार महेश बालदी यांना मोठा धक्का बसला आहे.

खोपोलीत मागील निवडणुकीत राष्ट्रवादाची सत्ता होती. यावेळी ही सत्ता खालसा झाल्याचे दिसून आले. खोपोलीत यावेळी वेगळीच राजकीय समीकरणे बघायला मिळाली. अजित पवार गट राष्ट्रवादी, शेकाप, उबाठा यांची युती झाली होती. दुसरीकडे आरपीआय, शिंदेगट शिवसेना आणि भाजपची युती झाली होती. येथील ३१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आरपीआय, शिंदेगट शिवसेना आणी भाजप यांनी बाजी मारली असून, या युतीचाच नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे निवडून आले, तर या युतीमधील शिंदे गटाला १४, भाजपच्या वाट्याला ४ जागा आल्या. तर राष्ट्रवादी, शेकाप, उबाठा गटातील राष्ट्रवादीला सात, शेकापच्या वाट्याला ४, तर उबाठाला एकही जागा मिळाली नाही. शरद पवार गट आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. कर्जतमध्ये मागिल निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्याकडे कर्जत नगरपालिकेची सत्ता होती. यावेळी तेथेही समीकरणे बदली असल्याचे दिसून आले. या निवडणुकीत अजित पवारगट राष्ट्रवादी, उबाठा, आणि रिपब्लिक स्वाभिमानी यांची युती असलेली परिवर्तन विकास आघाडी, दुसरीकडे शिंदेगट शिवसेना, भाजप व आरपीआय यांची महायुती अशी थेट लढत झाली. या लढतीत परिवर्तन विकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे या नगराध्यक्ष पदी निवडून आल्या. विकास आघाडीच्या वाट्याला एकुण १३, तर महायुतीच्या वाट्याला आठ जागा आल्या. एकुणच महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यात परिवर्तन विकास आघाडीला यश आले आहे. माथेरान नगर परिषदेत मागिल निवडणुकीत असलेली ठाकरेच्या शिवसेनेकडील सत्ता यावेळी महायुतीने आपल्याकडे घेतल्याने तेथील राजकीय समीकरणेही बदलली आहेत.

महायुतीचे चंद्रकांत चौधरी नगराध्यक्षपदी निवडून आले. येथे शिवसेना-भाजप महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा यांची युती झाल्याने यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा युती आपली ताकद दाखवू शकली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला चार, तर उबाठाच्या वाट्याला अवघी एकच जागा आली, तर नगराध्यक्ष पदासह १६ जागा महायुतीच्या वाट्याला आली आहे. पेण नगरपालिका निवडणुकीत तीन आघाड्यांसह शिंदेगट स्वतंत्र उतरल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.

त्यातच भाजपा आणि राष्ट्रवादी युतीने बाजी मारल्याने भाजपसह राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. भाजपाला १२, राष्ट्रवादीच्या वाट्याला ५ जागा आल्या असून, नगराध्यक्षपदी भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांच्या स्नुषा प्रीतम पाटील या निवडून आल्या. दुसरीकडे संतोष शृंगारपुरे यांच्या नगरविकास आघाडीला तीन, उबाठा आणि शिशिर धारकर गट यांच्या युतीला तीन, तर शिंदेंच्या शिवसेनेला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. यावरूनच पेणमध्ये शिवसेनेची ताकद कमी असल्याचे दिसून आले असून, भाजपच येथे बाजीगर असल्याचे दिसून आले.

Comments
Add Comment