नाशिक : उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटप होऊ शकले नाही. मागील दोन ते तीन दिवसांपासून जागावाटपासाठी बैठकींचे सत्र सुरू होते. कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर महायुती संपुष्टात आली. सोमवारी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.
झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याची आमची इच्छा होती. मात्र भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे आता स्वतंत्र निर्णय घ्यावा लागला. महायुतीत लढण्याचे ठरले असल्याने यापूर्वी जागावाटपाचा विषय पुढे आला नव्हता. मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत स्वतंत्र चर्चा सुरू झाली आहे. मेरिटनुसार उमेदवारी दिली जाईल,असे झिरवाळ यांनी सांगितले. ज्यांच्याकडे निवडणूक जिंकण्याची क्षमता (इलेक्टेबल मेरिट) आहे, त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि आनंद आंबेडकर यांच्या गटाला सोबत घेण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत उमेदवारी निश्चितीबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत एबी फॉर्म मिळणार आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षात देखील मोठी फूट पडण्याची शक्यता असून, त्यांच्याही निश्चित झालेल्या उमेदवारांना आज एबी फॉर्म चे वितरण केले जाणार आहे






