शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात व्हावी, या भावनेतून जगभरातील लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर साईनगरीत अभूतपूर्व गर्दी होत असताना भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सुव्यवस्थित दर्शनासाठी पोलीस प्रशासन, साई संस्थान व शिर्डी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले असून तब्बल ५०० पोलिसांच्या फौजफाट्यासह शिर्डीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबांच्या शिर्डीत दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी वर्षाच्या अखेरीस भाविकांचा महासागर उसळतो. यंदाही नाताळच्या सुट्ट्या सुरू होताच २५ डिसेंबरपासून शिर्डीत दररोज लाखो भाविक हजेरी लावत असून मंदिर परिसर, दर्शन रांगा, धर्मशाळा, रस्ते व हॉटेल्स गजबजून गेले आहेत.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता नगर–मनमाड महामार्गावरील मंदिरासमोरील लक्ष्मीनगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा संपूर्ण रस्ता ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतुकीचा ताणही कमी झाला आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात २२० पोलीस अंमलदार, २५ अधिकारी,१ उपविभागीय पोलीस अधिकारी, १ अपर पोलीस अधीक्षक व २५० होमगार्ड असा भक्कम बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसर व शहरातील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस नजर ठेवून आहेत. भाविकांच्या दागिन्यांची चोरी, चेनस्नॅचिंगसारखे प्रकार रोखण्यासाठी गुन्हे शाखेची विशेष पथके सिव्हिल ड्रेसमध्ये तैनात असून संशयितांची झाडाझडती घेतली जात आहे. भाविकांना सुरळीत व सुरक्षित दर्शन मिळावे, यासाठी गर्दी टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात बीडीएस, क्यूआरटी पथके सातत्याने तपासणी करत असून ३१ डिसेंबर रोजी दर दोन तासांनी २४ तास हे पथक कार्यरत राहणार आहे. नववर्ष साजरे करताना अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. ३१ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल व्यवसायिकांना परवानगी देण्यात आली असून त्यानंतर नियमभंग किंवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.थंडीचा पारा घसरलेला असतानाही बाबांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाल्याने शहरातील छोटे-मोठे हॉटेल, लॉजिंग, भोजनालयांना आर्थिक स्थैर्य लाभत आहे.
अनंत अंबानीकडून साई संस्थानला ५ कोटींची देणगी
ख्रिसमस उत्सव आणि नववर्षाच्या स्वागताच्या मंगलमय वातावरणात रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख उद्योगपती अनंत अंबानी यांनी तीर्थक्षेत्र शिर्डीत साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत श्रद्धेने दर्शन घेतले. साईबाबांच्या धुपारतीला उपस्थित राहत त्यांनी मनोभावे बाबांचे दर्शन घेतले, यावेळी साईनगरीत भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. अनंत अंबानी यांच्या शिर्डी दौऱ्यानिमित्त श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. साई संस्थानच्या परंपरेनुसार त्यांचा शाल व साईबाबांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रिलायन्स उद्योग समूहाकडून श्री साईबाबा संस्थानला तब्बल पाच कोटी रुपयांच्या दानाचा धनादेश अनंत अंबानी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या भरीव दानामुळे साई संस्थानच्या विविध सेवा, भाविकांसाठीच्या सुविधा तसेच सामाजिक व सेवाभावी उपक्रमांना मोठे बळ मिळणार आहे. दरम्यान,साईबाबांच्या धुपारतीला अनंत अंबानी यांनी उपस्थिती लावल्याने मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक भाविकांनी त्यांच्या उपस्थितीकडे कुतूहलाने पाहिले, तर साई नामाच्या जयघोषात परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. अनंत अंबानी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिर परिसर, दर्शन रांगा, प्रवेशद्वार तसेच प्रमुख मार्गांवर अतिरिक्त पोलीस फौजफाटा व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष होते. दर्शन व कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सतर्क होत्या. या भेटीसंदर्भात प्रतिक्रिया देताना साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई संस्थानच्या वतीने अनंत अंबानी व रिलायन्स उद्योग समूहाचे मनापासून आभार व्यक्त केले आणि या दानामुळे भाविकसेवा अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे नमूद केले.






