Monday, December 29, 2025

मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व संपले

मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व संपले

राखी जाधव भाजपात तर मनिषा रहाटे, पिसाळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक असतानाच आता विविध पक्षांमध्ये इच्छुकांकडून उडी मारण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबईतील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांनी चक्क पक्षाची साथ सोडली आहे. यामध्ये भाजपाच्या महापालिकेच्या माजी दोन गटनेत्यांसह एका नगरसेविकेने राष्ट्र्वादी काँग्रेस आणि भाजपात प्रवेश केला आहे. हे तिन्ही नगरसेवक राष्ट्र्वादी काँग्रेसच्या शरद पवार गटांमध्ये होते. त्यामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्र्वादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी भाजपात तर माजी महापालिका गटनेते धनंजय पिसाळ आणि बबन कनावजे यांच्यासह मनिषा रहाटे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.. त्यामुळे मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्वच आता संपुष्टात आले आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर माजी महापालिका गटनेते धनंजय पिसाळ, मनिषा रहाटे आणि माजी महापालिका गटनेते राखी जाधव हे शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये कायम राहिले होते. त्यानंतर राखी जाधव यांना मुंबई राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्षपद दिले होते. या तिघांच्या माध्यमातून मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व टिकून होते. परंतु हे तिन्ही माजी नगरसेवक आता भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्र्वादी काँग्रेसच्या राखी जाधव या घाटकोपर मधील प्रभाग क्रमांक १३१मधून निवडून आल्या होत्या आणि भाजपाचे भालचंद्र शिरसाट यांचा पराभव केला होता. परंतु राष्ट्र्वादी काँग्रेस आता उबाठा आणि मनसेसोबत नसल्याने अखेर घाटकोपरमधून निवडून येणे कठिण असल्याने राखी जाधव यांनी भाजपाची साथ पकडली आहे. राखी जाधव यांनी सोमवारी सकाळी स्थानिक आमदार पराग शाह यांची भेट घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राखी जाधव सन २००२ पासून नगरसेविका आहे. सलग तिन वेळा त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच सन २०१७मध्ये निवडून आल्यानंतर पक्षाच्या महापालिका गटनेत्या म्हणून निवड झाली होती.

तर राष्ट्र्वादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ११९मधील मनिषा रहाटे या २०१७च्या सार्वत्रिक निवउणुकीत प्रथम निवडून आली होती. आता आघाडी नसल्याने रहाटे यांनी अजित पवार गटांत उडी मारली आहे. लोकसभा निवडणुकीत उबाठा उमेदवाराचा प्रचार न केल्यामुळे यंदा त्यांचा पराभव करण्यात येणार असल्याची कुणकुण लागल्याने रहाटे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

तर मुंबई महापालिकेेचे माजी गटनेते धनंजय पिसाळ हे मागील २००२ पासून निवडून येत आहेत. कधी ते स्वत: तर कधी त्यांची पत्नी भारती पिसाळ या निवडून येत होत्या, परंतु २०१७च्या निवडणुकीत भाजपाच्या सारीका पवार यांनी भारती पिसाळ यांचा पराभव केला. त्यामुळे याठिकाणी एकट्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणे आणि जिंकणे शक्य नसल्याने त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे या तिन माजी नगरसेवकांसह मुंबईतील पक्षाच्या विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा तसेच राष्ट्र्वादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये प्रवेश केला. त्यामुळे मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसला मोठी धरघर लागली असून दुसरीकडे मुंबईत राष्ट्र्वादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन कनावजे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. कनावजे हेही यापूर्वी मुंबई महापालिकेत पक्षाचे गटनेते होते. सध्या ते शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये होते. परंतु त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे परळ भागातील पक्षाची ताकदही संपली गेली आहे.

यापूर्वी राष्ट्र्वादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ सईदा खान, माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, तर धनश्री भरडकर, रेश्मा बानो खान आणि सोफिया बानू यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर धनंजय पिसाळ आणि मनिषा रहाटे यांनीही राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांची संख्या ४ झाली, तर शिवसेनेत गेलेल्या राष्ट्र्वादी काँग्रेसमधील नगरसेवकांची संख्या तीन झाली आहे.

वांद्र्यात राष्ट्र्वादी काँग्रेसचे पदाधिकारी नाराजी, शिवसेनेच्या मार्गावर

वांद्रे पूर्व तालुक्यातील राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाला राम राम करत तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे नितीन गायकवाड हे पक्षाच्या पदाचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.

Comments
Add Comment