पालघर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक परिसर व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत पालघरचे अपर जिल्हादंडाधिकारी (गृह) सुभाष मच्छिंद्र भगाडे यांनी ड्रोनसह विविध हवाई साधनांच्या वापरावर निर्बंध घालणारे आदेश जारी केले आहेत.
तारापूर अणुऊर्जा केंद्र हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाण असल्याने परिसरात कोणत्याही प्रकारची संशयास्पद हवाई हालचाल टाळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा केंद्राच्या परिघातील १ किलोमीटर क्षेत्रात आरपीएएस (रिमोटली पायलटिंग एअरक्राफ्ट सिस्टीम) म्हणजेच ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर, हँगग्लायडिंग तसेच इतर कोणत्याही हवाई साधनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून लागू झाला असून तो ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुरक्षा यंत्रणा, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी व पर्यटकांनी या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






