संतोष वायंगणकर
नारायण राणे हे वटवृक्ष आहेत. त्यांच्यावरचा विश्वास आणि प्रेमाची पाळे-मुळे कोकणात खोलवर रूजली आहेत. राणे यांना विरोध करणाऱ्यांकडे चार-दोन कार्यकर्ते पैशांसाठी जमा होऊ शकतात. मात्र एक बाब स्पष्ट आहे, की कोणत्याही नेत्याच्या अवती-भवती पैशांसाठी गोळा झालेले कार्यकर्ते त्याचे नसतात, तर पैशांसाठी जमा झालेली ती भुतावळ असते. आर्थिकतेवर आधारलेली मैत्री, स्नेह दीर्घकाळ कधीच टिकत नाही. त्याला निश्चितपणे मर्यादा येतात. राणे यांचे राजकारण हे त्यांच्यावर जीव लावणाऱ्या कार्यकर्त्यांत आहे. ‘राणे समर्थक’ ही एक मजबूत ताकद कोकणच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रांत आहे. खासदार नारायण राणे यांच्याबरोबरच पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे राजकारण आणि राजकारणातील स्थान कोणीही कितीही प्रयत्न केले, तरीही बाजूला करता येणार नाही.
९० पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात कोकणाला फारसं स्थान नव्हतं. काँग्रेसी सत्तेच्याकाळात स्व. बाळासाहेब सावंत, कै. भाईसाहेब सावंत, कै. बापूसाहेब प्रभुगावकर, अॅड. एस. एन. देसाई, अॅड. ल. र. हातणकर हे राज्यात मंत्री राहिले. तर अमृतराव राणे, केशवराव राणे, शिवराम भोसले असे आमदार राहिले. यात कै. केशवराव राणे हे अखंड रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले होते. या सर्वांनीच कोकणच्या विकासात हातभार लावला. कै. भाईसाहेब सावंत, कै. एस. एन. देसाई यांनी आरोग्य आणि उद्योगांच्या बाबतीत प्रयत्न केले. खासदार म्हणून कै. प्रा.मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेसारखा प्रकल्प कोकणात पूर्णत्वाला जावा यासाठी प्रयत्न केले. यामुळे कोकणच्या विकासाचे निश्चितच अनेक वाटेकरी आहेत. बॅ. ए. आर. अंतुले यांना १८ महिन्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कालावधी मिळाला. ते प्रचंड निर्णय क्षमता असलेले मुख्यमंत्री म्हणून ओळखले गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती बॅ. अंतुलेंच्या काळातच झाली. सागरी महामार्ग हा त्यांचेच स्वप्न; परंतु कोकणच्या दुर्दैवाने बॅ. अंतुले यांना अधिकचा काळ मिळाला नाही; परंतु मधल्या अनेक वर्षांत राज्यात कोकणचं दमदार नेतृत्व नव्हतं. १९९० साली विद्यमान खासदार नारायण राणे यांची कोकणात एन्ट्री झाली. १९९० मध्ये कणकवली-मालवणचे आमदार म्हणून निवडून आले. १९९० ते २०२४ पर्यंत सर्व निवडणुकांमध्ये खा. नारायण राणे यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप राहिली. गेली ३५ वर्षे कोकणच्या सत्ताकारणात नारायण राणे नावाचं वादळ घोंघावत राहीलय. मुंबई महानगरपालिका नगरसेवक ते लोकसभेचे खासदार राज्यात मंत्री, केंद्रात मंत्री, विधानसभा, विधान परिषद, आमदार असे चार राजकीय वर्तुळ नारायण राणे यांनी पूर्ण केले आहे. हे सर्व एक दिवसात किंवा पाच वर्षांत मिळालेलं नाही. त्यासाठी जनतेचा विश्वास संपादन करतच त्यांची वाटचाल होत राहिली. राजकारणातील बदलते वारे लक्षात घेऊन त्यांनी काही पक्षीय बदलाचे निर्णय जरूर घेतले; परंतु त्यामागेही निश्चितपणे कोकण हिताचाच विचार होता. १९९५ पासून कोकणचे राजकारण नारायण राणे या नावाभोवतीच फिरत राहिले. नारायण राणे यांना अनेकदा नानाविध प्रकारे संघर्षाला उभं राहावं लागलं. अनेक घटनांमध्ये त्यांचा दूरान्वयेही कोणताही संबंध नसताना त्यांच्या नावार ते चिकटविण्यात आले. अनेक राणे विरोधकांनी त्यांना दहशतवादी ठरवलं; परंतु कोकणातील जनतेने मात्र नारायण राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं पसंत केलं. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला; परंतु तत्पूर्वी आणि तद्नंतर राणे यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही.
युती असेल किंवा आघाडी असेल. राणे नेहमीच त्या-त्यावेळी प्रामाणिक राहिले. नारायण राणे यांची दोन उदाहरण सांगतो. तेव्हा नारायण राणे शिवसेनेत होते. शिवसेना-भाजप युती होती. शिवसेना भाजपचे देवगड मतदारसंघाचे आमदार होते. आप्पासाहेब गोगटे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते; परंतु त्या निवडणुकीत कै. नारायण उपरकर या कट्टर शिवसैनिकाने आप्पासाहेब गोगटे विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. नारायण उपरकर यांच्या उमेदवारीला देवगड मतदारसंघातील शिवसैनिकांचा सपोर्ट होता. देवगडमध्ये भाजपपेक्षाही शिवसेना तेव्हा अधिक मजबूत होती. कडवट शिवसैनिकांची फौज होती, तर या निवडणुकीत आप्पासाहेब गोगटे यांना पराभव पत्करावा लागणार अशी स्थिती निर्माण झाली. ही बाब त्यावेळचे शिवसेनेचे नेते नारायण राणे यांच्या लक्षात येताच राणे यांनी निरोमचे कै. अनंत राऊत, वारगावचे कै. बाळा वळंजू यांना कामाला लावत ही मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी त्यावेळचे नारायण राणे यांचे निकटवर्तीय गौरीशंकर खोत यांच्यावर सोपवण्यात आली. देवगडात काका राऊत, बाळ खडपे अशा नाराजांना विश्वासात घेत कोणत्याही स्थितीत भाजपचे आप्पासाहेब गोगटे विजयी झालेच पाहिजे यासाठी सारी शक्ती लावली आणि त्या निवडणुकीत सेना-भाजप युतीचे आप्पासाहेब गोगटे ९ हजार मतांनी विजयी झाले. हे जुन्या-जाणत्या भाजपयींना आठवत असेल.
दुसऱ्यावेळी देवगड मतदारसंघातच माजी आमदार अजित गोगटे आणि कै. कुलदीप पेडणेकर यांच्यामध्ये लढत झाली. अॅड. अजित गोगटे यांचा पराभव होताना वाचले ते देखील खा. नारायण राणे यांच्यामुळेच. आचरा आणि नांदगाव, खारेपाटण विभागातील शिवसैनिकांना जेव्हा अजित गोगटे पराभूत होणार हे लक्षात आले तेव्हा शिवसैनिकांना कामाला लावले. कोणत्याही स्थितीत अजित गोगटे निवडून यायलाच हवेत असा आपुलकीचा दम नारायण राणे यांनी शिवसैनिकांना दिला आणि मग दादांचा शब्द पडू द्यायचा नाही म्हणून सारे कामाला लागले. अॅड. अजित गोगटे अवघ्या हजार-बाराशे मतांनी निवडून आले. पूर्वीच्या भाजपयींना हे आठवत असेल राणे कधी गद्दारी करत नाहीत. ‘मुँह में राम बगल में छुरी’ असले पाठीत वार करणार नाहीत. जे मनात तेच ओठात. म्हणूनच अनेकवेळा छुपेपणाचे काँग्रेसी राजकारण खा. नारायण राणे किंवा पालकमंत्री नितेश राणे वा आ. निलेश राणे यातल्या कोणालाच असे दुतोंडी राजकारण जमले नाही. मग नुकसान होऊदेत किंवा फायदा जे काही व्हायचे असेल ते होऊ दे त्याची चिंता कधी कोणतेच राणे करीत नाहीत. ज्या पक्षात खा. नारायण राणे असतील त्या पक्षात ते प्रामाणिक असतात. राणे यांचे राजकारण पैशाचे नाही. कार्यकर्त्यांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे प्रेम हीच त्यांच्या राजकारणाची शिदोरी आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे वगळून कोणीही उमेदवार असता तर दोन तीन लाखांनी पराभूत झाला असता. फक्त दादांच्या प्रेमापोटी लोकांनी मतदान केले हे कोणालाही नाकारता येणार नाही. ‘राणे समर्थक’ ही एक मजबूत ताकद कोकणच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात आहे. खा. नारायण राणे यांच्याबरोबरच पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे यांचं राजकारण आणि राजकारणातील स्थान कोणी कितीही प्रयत्न केले तरीही बाजूला करता येणार नाही. खा. नारायण राणे यांचे स्थान कुणाला घेता येणार नाही. राणे असणारच आहेत. राणे काल होते, आजही आहेत आणि उद्याही कोकणात राणेच असणार आहेत!