व्हिएतनाम : नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी, सेलिब्रेशन आणि मित्रमंडळींसोबत जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. या सगळ्यात बिअरप्रेमींची संख्या मोठी असते. मात्र, गेल्या काही काळात बिअरच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे अनेकांच्या खिशावर ताण आला आहे. अशातच नववर्षाआधी तळीरामांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या १८ ते २५ रुपयांत बिअरचा आस्वाद घेता येतो, असं ऐकल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल. मात्र हे शक्य आहे आणि तेही एका विशिष्ट देशात.
जगातील अनेक देशांमध्ये मद्यावर मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो. मात्र व्हिएतनाममध्ये याचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे. व्हिएतनाममध्ये स्थानिक पातळीवर तयार केली जाणारी ‘बिया होई’ नावाची बिअर जगातील सर्वात स्वस्त बिअर मानली जाते. विशेष म्हणजे या देशात पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची किंमत साधारण १०० रुपयांच्या आसपास असते, तर बिअरचा एक ग्लास अवघ्या १८ ते २५ रुपयांना मिळतो. त्यामुळे इथे पाण्यापेक्षा बिअर स्वस्त असल्याचे चित्र पाहायला मिळते.
‘बिया होई’ ही बिअर प्रामुख्याने तांदळापासून तयार केली जाते. या बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण फक्त २ ते ३ टक्के इतके असते. ही बिअर बाटल्यांमध्ये पॅक न करता थेट पिंपातून विकली जाते, हे तिचे खास वैशिष्ट्य आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारकडून या बिअरवर कोणताही अतिरिक्त कर आकारला जात नाही. उत्पादन खर्च कमी आणि स्थानिक विक्रीवर भर असल्यामुळे तिची किंमत अत्यंत कमी राहते. ही बिअर दररोज ताजी तयार करून लगेच विकली जाते. त्यामुळे व्हिएतनामला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या बिअरला पहिली पसंती दिली आहे.
दरम्यान, मद्याच्या किमतींचा विचार केला तर कतार, आइसलँड आणि नॉर्वे यांसारख्या देशांमध्ये मद्यावर कडक निर्बंध आणि जड कर आहेत. कतारमध्ये एका पिंट बिअरसाठी साधारण ९३० ते ११०० रुपये मोजावे लागतात. याउलट व्हिएतनाम, मेक्सिको आणि जमैका यांसारख्या देशांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी मद्याचे दर तुलनेने कमी ठेवले आहेत. भारतातही गोव्यात मद्यावर अत्यल्प कर असल्यामुळे तिथे बिअर स्वस्त मिळते. त्यामुळे नववर्षाच्या काळात गोव्यात तळीरामांची मोठी गर्दी पाहायला मिळते.






