प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक
नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित हातांची चर्चा आता सुरू झाली आहे. एसजी पायपर्सच्या साहाय्यक प्रशिक्षिका आणि भारताच्या माजी गोलरक्षक हेलिना मेरी यांनी तरुण गोलरक्षक बन्सुरी सोलंकी हिचे तोंडभरून कौतुक केले आहे.
बन्सुरीमध्ये जागतिक दर्जाची गोलरक्षक बनण्याची सर्व लक्षणे असून ती लवकरच भारतीय वरिष्ठ संघात स्वतःचे स्थान निश्चित करेल, असा विश्वास मेरी यांनी व्यक्त केला आहे. हेलिना मेरी यांच्या मते, बन्सुरी सोलंकी ही अत्यंत हुशार खेळाडू असून तिची शिकण्याची ओढ अफाट आहे. "बन्सुरीचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे.
सध्या ती हॉकीच्या '५-एस' फॉरमॅटमधून प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये स्वतःला जुळवून घेत आहे. ज्या वेगाने तिची प्रगती सुरू आहे, ते पाहता पुढील २ ते ३ वर्षांत ती भारतीय वरिष्ठ संघाची मुख्य गोलरक्षक म्हणून मैदानात दिसेल," असे भाकीत मेरी यांनी वर्तवले आहे.
एसजी पायपर्स संघात बन्सुरीला अर्जेंटिनाची ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती गोलरक्षक क्रिस्टिना कोसेन्टिनो हिच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे. जगातील सर्वोत्तम गोलरक्षकासोबत सराव केल्यामुळे बन्सुरीचा आत्मविश्वास दुणावला आहे. मुख्य प्रशिक्षिका सोफी गिएर्ट्स यांनीही बन्सुरीच्या 'लाइन वर्क' आणि अचूक पोझिशनिंगचे कौतुक केले आहे.
महिला हॉकी इंडिया लीगकडे लक्ष
महिला हॉकी इंडिया लीगच्या आगामी हंगामासाठी एसजी पायपर्स संघाने बन्सुरीवर मोठा विश्वास दाखवला आहे. क्रिस्टिना कोसेन्टिनोसाठी ती एक भक्कम 'बॅक-अप' म्हणून उपलब्ध असेलच, पण संधी मिळाल्यास ती प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठे आव्हान ठरू शकते. भारतीय हॉकीच्या या उदयोन्मुख ताऱ्याकडून आता क्रीडा प्रेमींना मोठ्या अपेक्षा आहेत.






