Monday, December 29, 2025

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत नाही. आपल्या लावणी नृत्याने अवघ्या महाराष्ट्रावर भूरळ घालणारी लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना सुरेखा कुडची एकत्र लावणीचा फड गाजवताना दिसणार आहेत. ‘जब्राट’ या आगामी मराठी चित्रपटात या दोघींची एक फक्कड लावणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या ६ फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या लावणीची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हिंदवी पाटील आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या ठसकेबाज लावणीची जुगलबंदी यात पाहायला मिळत आहे. ही लावणी सादर करताना आम्ही आनंद घेतला हाच आनंद रसिकांना ही मिळेल असा विश्वास या दोघींनी व्यक्त केला.

किती सावरू पुन्हा पुन्हा कशा झाकू या खाणाखुणा नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हा

या डॉ.जयभीम शिंदे लिखीत शब्दांना हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांनी आपल्या मोहक अदाकारीने झक्कास रंग भरले आहेत. बेला शेंडेच्या स्वरातील या लावणीला डॉ.जयभीम शिंदे यांनी ठेका धरायला लावणारं संगीत दिलं आहे. या बहारदार लावणीचं नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले आहे.

‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

Comments
Add Comment