नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे की, कसोटी संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्क साधल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार आहेत, बोर्डाने कसोटी संघाच्या नेतृत्त्व गटात बदल करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सैकिया यांनी सांगितले की, ही बातमी पूर्णपणे तथ्यहीन आहे. काही प्रतिष्ठित माध्यम संस्था देखील ही बातमी चालवत आहेत, परंतु यात कोणतेही सत्य नाही. बीसीसीआय याचे थेट खंडन करते. अलीकडच्या काळात अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, कसोटी संघाच्या खराब कामगिरीनंतर व्हीव्हीएस लक्ष्मणला पुढील कसोटी प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिकेकडून २-० ने कसोटी मालिका गमवावी लागल्यानंतर या अटकळी समोर आल्या. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धही संघाला ०-३ ने पराभवाला सामोरे जावे लागले होते.
टेस्ट क्रिकेटमधील अलीकडील अपयशाच्या विपरीत, मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी मजबूत राहिली आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप टी-२० एकही सामना न हरता जिंकले. मात्र, त्यांच्या कार्यकाळात भारताने टेस्टमध्ये ७ सामने जिंकले, १० हरले आणि २ ड्रॉ खेळले आहेत. सध्या भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान कसोटी नाही, तर टी-२० विश्वचषक आहे. संघ आपल्या विजेतेपदाचे रक्षण करेल. यावेळी संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हातात असेल. स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि भारत आपला पहिला सामना त्याच दिवशी मुंबईत अमेरिकेविरुद्ध खेळेल.






