Monday, December 29, 2025

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर,  जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण एसटी महामंडळाने फिरणाऱ्या हौशींसाठी खास घोषणा केली आहे. ज्यात 'पैसे कमी, प्रवास जास्त' अशी मस्त ऑफर आहे. सुट्टी म्हणजे फक्त घरात बसून झोपा काढणे नाही, तर अनुभवांची शिदोरी जमवणे असते. हेच ओळखून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं पुन्हा एकदा ‘आवडेल तिथे प्रवास’ ही खास योजना जाहीर केलीय. या योजनेत प्रवाशांना चार किंवा सात दिवस महाराष्ट्रातच नाही, तर परराज्यातही एसटीने मुक्तपणे प्रवास करता येणार आहे. यापूर्वी एसटी महामंडळाने ही योजना दिवाळी सुट्ट्यांमध्ये आणली होती. या योजनेतील खास गोष्ट म्हणजे प्रवासासाठी लागणारे पासचे दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलेत. ही योजना साध्या बसपासून शिवशाही आणि ई-शिवाईपर्यंत सर्वांना लागू आहे.

महामंडळाच्या या योजनेत ५ ते १२ वर्षांच्या मुलांना ५० टक्के सवलत, तर तरुण वयोगटासाठी ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. चार दिवसांच्या पाससाठी प्रौढांसाठी दरही ठरलेत. ज्यातून दिसून येते की दरात किती कपात केली आहे. प्रौढांसाठी साध्या बसचा जुना दर आहे १,८१४ तर नवीन दर आहे १,३६४ रुपये. शिवशाही बसचा जुना दर २,५३३ तर नवीन दर आहे १,८१८ रुपये. ई- शिवाई जुना बस दर आहे २,८६१ तर नवीन दर आहे २,०७२ इतका. तर ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे प्रवास दरही ठरले आहेत. लहानग्यांसाठी साध्या बसचा जुना दर ९१० असून नवीन दर ६८५ रुपये आहे. तर शिवशाही बसचा जुना दर १२६९ असून नवीन दर ९११ रुपये आहे. तसेच ई- शिवाई बसचा जुना दर १,४३३ होता आणि योजनेमध्ये तो १,०३८ झाला आहे.

सात दिवसांच्या साध्या बसपाससाठी प्रौढांना जुना दर ३,१७१ होता. तर नवीन दर २,६३८ रुपये इतका आहे. शिवशाही बसचा जुना दर ४,४२९ तर नवीन दर ३,१७५ रुपये आहे. ई- शिवाई बसचा जुना दर ५,००३ तर नवीन दर ३,६१९ रुपये आहे. तर ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना सात दिवसांसाठी साध्या बसचा जुना दर १,५८८ तर नवीन दर १,१९४ रुपये असून शिवशाही बसचा जुना दर २,२१७ रुपये, तर नवीन दर १,५९० रुपये इतका आहे. तसेच ई- शिवाई बसचा जुना दर २,५०४ तर नवीन दर १,८१२ रुपये इतका आहे.

ही योजना म्हणजे फक्त सवलत नाही, तर लोकांना प्रवासाकडे पुन्हा वळवण्याचा एसटीचा सकारात्मक प्रयत्न आहे. तेव्हा सुट्टी मोजा आणि एसटीसोबत ‘आवडेल तिथे प्रवासा’च्या तयारीला लागा. कारण आता फिरणे लक्झरी नाही तर परवडणारे झाले आहे.

Comments
Add Comment