मुंबई: राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवार गटाने मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी रोहित पवार यांना दिल्याने राखी जाधव नाराज झाल्याचे चिन्ह आहे. यामुळे शरद पवार गटाला राम राम देऊन, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. राखी जाधव यांचा आजच पक्षप्रवेश होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई अध्यक्षांनीच पक्षाची साथ सोडल्यामुळे शरद पवार गटाला धक्का बसणार आहे.
राखी जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला एकहाती लढवत होत्या. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्या शरद पवार गटासोबत एकनिष्ठ होत्या. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शरद पवार गट आणि उबाठामध्ये असलेल्या आघाडीमध्ये शरद पवार गटाच्या वाट्याला फक्त ५ ते १० जागा आल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. राखी जाधवांप्रमाणेच गटातील इतर कार्यकर्तेसुद्धा नाराज असल्याने अनेकांनी अजित पवारांकडे मोर्चा वळवला. तर राखी जाधव यांनी थेट कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. राखी जाधव या राजकारणातील प्रवेशापासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. पक्ष फुटीनंतर त्या शरद पवार गटामध्ये सक्रिय होत्या. मागील अनेक वर्षापासून त्या मुंबईमध्ये राष्ट्रवादीची धुरा सांभाळत आहेत. घाटकोपरच्या पूर्व भागात त्या स्थानिक नेत्या म्हणून सक्रिय असून मतदार संघातील प्रत्येकासोबत त्यांचा जवळचा संबंध आहे. मागील दोन वर्षापासून त्या शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असून त्यांच्याकडे अनेक वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे.






