विशेष : लता गुठे
छत्रपती शिवरायांच्या शौर्याने आणि पराक्रमाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आहे. या भूमीवरच उभी असलेली शिवरायांची गौरव गाथा आजही त्याची साक्ष देते. याचेच उदाहरण म्हणजे २०२५ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ (UNESCO World Heritage Sites) यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे किल्ले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ज्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे, ते किल्ले आहेत, साल्हेर किल्ला मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा पहाडी किल्ला आहे. दुसरा आहे शिवनेरी किल्ला ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तिसरा किल्ला म्हणजे लोहगडचा किल्ला. चौथा आहे खांदेरी किल्ला समुद्रकिनारी असलेला. यानंतर रायगड किल्ला जो मराठा साम्राज्याची राजधानी समजतात. रायगड नंतर प्रतापगड किल्ला तसेच सुवर्णदुर्ग किल्ला, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग , सिंधुदुर्ग, जिंजी हा तामिळनाडूमधील किल्ला आहे. या मुख्य किल्ल्यांचा समावेश आहे. यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा किल्ला आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग आज सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती या लेखामध्ये सविस्तर समाविष्ट करत आहे. जागतिक वारसा स्थळांमध्ये या किल्ल्याचा समावेश का केला गेला याची कारणे या लेखामध्ये मिळतील. सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे कोकणच्या निळ्याशार समुद्रात उभे असलेले स्वराज्याचे अभेद्य स्वप्न असे म्हटले जाते. मालवणच्या किनाऱ्याजवळ, कुरटे बेटावर उभारलेला हा किल्ला शिवाजी महाराजांच्या सागरी धोरणाचा कळस मानला जातो. किल्ल्याच्या भक्कम तटबंदीमध्ये वापरलेले लोखंडी सळे, दगडांमध्ये ओतलेले शिसे आणि समुद्राच्या लाटांशी झुंज देणारी रचना पाहिली की, त्या काळातील अभियांत्रिकी ज्ञान किती प्रगल्भ होते हे पाहून आश्चर्य वाटतं.
सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये मालवणजवळ अरबी समुद्रात बांधलेला एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे, जो मराठ्यांच्या नौदल सामर्थ्याचे प्रतीक आहे; हा किल्ला सुमारे ४८ एकरमध्ये पसरलेला असून, सुमारे ३ किमी लांबीचा तट, ५२ बुरुज आणि मजबूत बांधकाम, शिसे वापरून केलेला पाया आणि शत्रूंना सहज दिसू नये अशा पद्धतीने बांधलेले प्रवेशद्वार यासाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला एक गुप्त द्वार आहे ते बाहेरून दिसत नाही.
हे किल्ल्याचे प्रवेशद्वार इतके कुशलतेने बांधलेले आहे की, शत्रूला ते सहज लक्षातही येत नाही. किल्ल्याच्या आत असलेले शिवाजी महाराजांचे मंदिर हा एक दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा आहे जो इतर किल्ल्यांमध्ये पाहायला मिळत नाही. सिंधुदुर्ग केवळ संरक्षणाच्या दृष्टीनेच महत्त्वाचा किल्ला नव्हता, तर स्वराज्याच्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक होता. अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेला हा आगळावेगळा भव्य किल्ला आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची निवड होताना, त्यातील स्थापत्य, वैशिष्ट्ये, नैसर्गिक पर्यावरणाशी असलेली सांगड आणि ऐतिहासिक महत्त्व या सर्व बाबी जागतिक अभ्यासकांना भारावून टाकणाऱ्या ठरल्या आणि या किल्ल्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला. या लेखाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या कार्याला केलेला सलाम आहे. पुढच्या लेखांमध्ये आणखी विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग या दोन किल्ल्यांचा समावेश करण्यात येईल.






