कथा : प्रा. देवबा पाटील
सीता व नीता या दोन्ही बहिणी खूपच चौकस होत्या. सुट्टीनिमित्ताने त्यांची प्राध्यापिका मावशीही त्यांच्या घरी आलेली होती. या दोघीही दररोज मावशीला काही ना काही प्रश्न विचारीत असत.
“मावशी सकाळी सूर्य पूर्वेकडेच का उगवतो?” नीताने प्रश्नाद्वारे आपल्या बुद्धीची झलक दाखवली. “आणि संध्याकाळी पश्चिमेसच का मावळतो मावशी?” सीतानेही आपली हुशारी दाखवली. “अरे वा, दोघीही बहिणींची विचारक्षमता एकदम चांगली आहे.” मावशीही आनंदाने म्हणाली.
मावशी पुढे म्हणाली, “आपली पृथ्वी ही सतत सूर्याभोवती फिरत असते. त्याचवेळी ती स्वत:भोवतीही सदोदित फिरत असते. कोणत्याही ग्रहाच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण तर स्वत:भोवतीच्या फिरण्यास म्हणजे स्वत:भोवती गिरकी घेण्यास परिवलन असे म्हणतात, तर आपली पृथ्वी ही स्वत:भोवती फिरताना ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. त्यामुळे आपणास सूर्य हा दररोज सकाळी पूर्वेकडूनच उगवताना दिसतो आणि संध्याकाळी पश्चिमेकडे मावळतो. वास्तविकता पृथ्वीच्या तुलनेत सूर्य हा स्थिरच असतो पण पृथ्वीच्या भ्रमणाने तो आपणास फिरताना दिसतो. सूर्य ज्या मार्गावरून आपणास जाताना दिसतो त्याला सूर्याचा भासमान मार्ग असे म्हणतात. चंद्र-चांदण्याही तशाच आपणास पूर्वेकडूनच उगवताना दिसतात आणि पश्चिमेकडे मावळताना दिसतात.” “पण मावशी, आपणास सूर्य हा किंचितसा तिरपा उत्तरेकडून उगवताना दिसतो.” सीता विचारीत असताना मध्येच, “तर कधी थोडासा तिरपा दक्षिणेकडून उगवताना दिसतो. असे कसे दिसते?” नीताने विचारले. “तुमचे एवढे बारीक निरीक्षण बघून मला खरंच अतोनात आनंद होत आहे.” मावशी म्हणाली, “तुम्हाला उत्तरायण व दक्षिणायन म्हणजे काय असते हे माहीत आहे का?” “नाही मावशी.” दोघीही बोलल्या.
सूर्य बरोबर पूर्वेकडे फक्त २१ मार्च व २१ सप्टेंबर या दोन दिवशीच उगवत असतो. या दोन दिवसांना “विषुवदिन” असे म्हणतात. २१ मार्चला सूर्य तंतोतंत पूर्वेला उगवतो व पचिमेला मावळतो. त्यानंतर २२ मार्चपासून तो दररोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकतो म्हणजे हळूहळू पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडील भागाकडे अर्थात उत्तर गोलार्धाकडे जातो. २१ जूनपर्यंत तो असा दररोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकत जातो. या दिवशी तो उत्तरेच्या जास्तीत जास्त अंतिम बिंदूवर असतो. त्यानंतर म्हणजे २२ जूनपासून तो पलटी खातो नि पुन्हा रोज थोडा थोडा परत पूर्वेकडे सरकताना दिसतो. जेव्हा तो थोडासा उत्तरेकडून उगवताना दिसतो नि मावळताना थोडासा उत्तरेकडे सरकलेला दिसतो त्या काळाला सूर्याचे उत्तरायण असे म्हणतात. या कालावधीत सूर्याचा भासमान मार्ग हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातून होत असल्याने त्याला सूर्याचे उत्तरायण म्हणतात. उत्तरायणाचा कालावधी २२ मार्च ते २१ सप्टेंबरचा असतो. २१ सप्टेंबरला तो तंतोतंत पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो. २२ सप्टेंबरपासून तो दररोज थोडा थोडा दक्षिणेकडे जातो म्हणजे पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाकडील भागाकडे अर्थात दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. २१ डिसेंबरपर्यंत तो असा दररोज थोडा थोडा दक्षिणेकडे सरकतो. या दिवशी तो दक्षिणेच्या जास्तीत जास्त अंतिम बिंदूवर असतो. त्यानंतर २२ डिसेंबरपासून तो पलटी खाऊन पुन्हा परत रोज थोडा थोडा पूर्वेेकडे सरकताना दिसतो. जेव्हा तो किंचितसा दक्षिणेकडून उगवताना दिसतो व मावळतानाही किंचितसा दक्षिणेकडे सरकलेला दिसतो त्याला सूर्याचे दक्षिणायन म्हणतात. या कालावधीत सूर्याचा भासमान मार्ग हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून होत असल्याने त्याला सूर्याचे दक्षिणायण म्हणतात. हा दक्षिणायनाचा कालावधी २२ सप्टेंबर ते २१ मार्चपर्यंतचा असतो. २१ मार्चला तो पुन्हा तंतोतंत पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो. २१ जून आणि २१ डिसेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तापासून महत्तम म्हणजे जास्तीत जास्त अंतरावर जात असल्यामुळे या काळाला अयनकाल म्हणजे सूर्याच्या उत्तर किंवा दक्षिण गतीचा शेवट म्हणतात, मावशीने सांगितले. “मुलींनो आज आपण जरा आपली चर्चा थांबवू का?” मावशीने प्रश्न केला. “हो हो चालेल.” दोघीही बोलल्या.






